ई-चलान महिनाभरात
By Admin | Updated: June 20, 2016 02:55 IST2016-06-20T02:55:07+5:302016-06-20T02:55:07+5:30
वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाला सध्या कागदी पावती दिली जाते. यात बराच वेळ जात असल्याने कॅशलेस ट्रान्झॅक्शनची सुविधा असलेली ई-चलान सेवा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

ई-चलान महिनाभरात
मुंबई : वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाला सध्या कागदी पावती दिली जाते. यात बराच वेळ जात असल्याने कॅशलेस ट्रान्झॅक्शनची सुविधा असलेली ई-चलान सेवा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सुविधेवर काम सुरू असून, येत्या महिनाभरात ती सुरू करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते. वर्षाला जवळपास १५ लाख ते २0 लाखांच्या दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन होणाऱ्या केसेसची नोंद होत आहे. यात बेदरकारपणे वाहन चालविणे, सिग्नल नियम मोडणे, नो पार्किंग, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, विनाहेल्मेट, दारू पिऊन वाहन चालविणे, सीट बेल्ट न लावणे इत्यादी गुन्ह्यांचा समावेश आहे. नियम मोडल्यास तत्काळ दंडात्मक कारवाई वाहनचालकावर केली जाते. ही कारवाई करताना चालकाकडून दंड हा रोख रकमेव्दारे भरला जातो. यात वाहनचालकाचा आणि पोलिसाचा बराच वेळ जातो. हा वेळ वाचावा आणि कारवाईचा वेग वाढावा तसेच वाहनचालकालाही दंड भरण्यास सोपे जावे, या सर्व दृष्टिकोनातून ई-चलान सुविधा सुरू करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांकडून घेण्यात आला. त्यावर अनेक महिन्यांपासून काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. शासनाकडूनही या सुविधेबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. ही सुविधा आणल्यास वाहनचालक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आर-वॉलेटव्दारे तत्काळ दंड भरून मोकळा होऊ शकतो. ज्या चालकांना अशाप्रकारे दंड भरण्यास अवघड जात असेल किंवा त्यांना ई-चलान ही प्रक्रिया माहिती नसेल तर त्यांच्यासाठी ‘कॅश कलेक्शन पॉइंट’ सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. (प्रतिनिधी)