ई-बिझनेसने प्रादेशिक सीमा पुसल्या!

By Admin | Updated: November 22, 2015 02:41 IST2015-11-22T02:41:56+5:302015-11-22T02:41:56+5:30

ई-बिझनेस हा शब्द लहानसा वाटत असला तरी ही संकल्पना आकाशाहून व्यापक आहे. ई-बिझनेस या शब्दाचा वापर सर्वप्रथम केला तो ‘आयबीएम’ या विख्यात कंपनीने; आणि तोही

E-Business wipes regional boundaries! | ई-बिझनेसने प्रादेशिक सीमा पुसल्या!

ई-बिझनेसने प्रादेशिक सीमा पुसल्या!

- सचिन लुंगसे

ई-बिझनेस हा शब्द लहानसा वाटत असला तरी ही संकल्पना आकाशाहून व्यापक आहे. ई-बिझनेस या शब्दाचा वापर सर्वप्रथम केला तो ‘आयबीएम’ या विख्यात कंपनीने; आणि तोही १९९७ साली. म्हणजे अलीकडेच. खरेतर, कंपनीने हा शब्द प्रचार मोहिमेसाठी वापरला. कालांतराने तंत्रज्ञानाने एवढी भरारी घेतली की ई-बिझनेस हा शब्द आपसुकच तोंडात बसला. परिणामी, आता व्यापार क्षेत्र व्यापत असलेल्या या ई-बिझनेसने प्रादेशिक सीमा पुसल्या आहेत. त्यामुळे झाले असे की उद्योगाची व्याप्ती वाढली आहे. शिवाय विक्री आणि खरेदीच्या संकल्पनाही बदलल्या आहेत.
ई-बिझनेस समजावून घ्यायचे म्हटले तर यासंदर्भातील सेवा साध्यासुध्या वाटणाऱ्या इंटरनेट अथवा एक्स्ट्रानेटसारख्या ई-सेवांचे जाळे विणण्यापासून उर्वरित कोणत्याही मोठ्या उद्योगासाठी वापरता येतात. समजा एखाद्या व्यावसायिक संस्थेला ई-बिझनेसची अंमलबजावणी करायची झाली तर त्यांनी सर्वांत पहिल्यांदा इंटरनेटमार्फत ग्राहकांशी दीर्घकालीन संवाद सुरू करणे गरजेचे आहे; आणि जेव्हा केव्हा हा संवाद सुरू होईल तेव्हा संवादादरम्यानच्या अपेक्षा समजावून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे होईल असे की, व्यवसाय प्रणालीवर नियंत्रण आणता येईल आणि परिणामकारकता वाढवता येईल. त्यामुळे व्यवसायवृद्धीचे उद्दिष्ट गाठणे शक्य होऊन यश संपादन सोपे होईल. आजघडीला तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की, त्यामुळे ई-बिझनेस हे आता एका व्यक्तीचे सहज आणि सोपे असे व्यावसायिक सादरीकरण झाले आहे. आणि नाही म्हटले तरी या माध्यमातून संबंधित व्यक्ती अप्रत्यक्षरीत्या अनेक ग्राहकांशी जोडली जात आहे. या सेवेमुळे संबंधितांना आपल्या कामाच्या वेळा आपापल्या सोयीनुसार ठरवता येत आहेत. इंटरनेट या एका सुविधेमुळे ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. या क्षेत्राचा आवाका आपण विचारदेखील करू शकणार नाही एवढा विलक्षण आणि मोठा आहे.
सर्वांत महत्त्वाची बाब ती अशी की, या उद्योगात स्वत:च स्वत:चे मालक असल्याने आपण इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ शकतो. शिवाय या माध्यमातून उद्योजकाला दुहेरी उत्पन्नाची संधीही उपलब्ध होऊ शकते. मात्र यात जोखीमही तेवढीच आहे. कारण या प्रक्रियेत आपण स्वत: मालक-चालक असतो. त्यामुळे नुकसानही आपल्यालाच सहन करावे लागते. म्हणजे इंटरनेटचे जाळे वाढल्याने आपल्यातील प्रत्येकाला ई-बिझनेस करण्याची संधी मिळते. एकंदर काय तर आजमितीस वाढलेली इंटरनेटची लोकप्रियता लक्षात घेता ई-बिझनेस पारंपरिक व्यवसायांनाही भुरळ घालू लागला आहे.

उद्योग म्हटला की उलाढाल ही आलीच. म्हणून एक ओझरती नजर उलाढालीवर टाकू या. २०१३ सालाच्या अखेरीस देशातील बिझनेस विश्लेषण क्षेत्रातील उलाढाल ६० अब्ज कोटी रुपये एवढी होती; आणि त्यापुढील पाच वर्षांत यात दुपटीने वाढ होईल, अशी शक्यताही वर्तवण्यात आली होती. नॅसकॉमच्या अनुमानानुसार, २०१८ साल अखेरीस उद्योगाची वार्षिक उलाढाल १४३ अब्ज होईल. म्हणजे काय तर जगात सर्वत्र उद्योगाची व्याप्ती वाढते आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशननुसार, २०२०पर्यंत डेटा प्रॉडक्शन पन्नास पटींनी वाढणार आहे. याचा अर्थ करिअर म्हणूनही या उद्योगाकडे पाहण्यास हरकत नाही.

Web Title: E-Business wipes regional boundaries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.