डायघरचा दुसरा प्रकल्प बारगळणार!
By Admin | Updated: November 21, 2014 23:16 IST2014-11-21T23:16:22+5:302014-11-21T23:16:22+5:30
दिव्यातील रहिवाशांनी एल्गार पुकारल्याने पालिकेने आता डम्पिंगसाठी पर्यायी जागा शोधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

डायघरचा दुसरा प्रकल्प बारगळणार!
ठाणे : दिव्यातील रहिवाशांनी एल्गार पुकारल्याने पालिकेने आता डम्पिंगसाठी पर्यायी जागा शोधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे डायघर येथे जुना प्रकल्प बारगळल्यानंतर येथे नव्याने कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. परंतु, गावकऱ्यांचा याला विरोध झाल्याने या प्रकल्पाचेही भवितव्य अधांतरी सापडले आहे. असे असतानादेखील पालिका या प्रकल्पावर खर्च करू पाहत आहे. आधीच पालिकेची परिस्थिती ढासळलेली असताना पुन्हा प्रकल्प होणार नसेल तर हा खर्च कशासाठी, असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
ठाणे शहरात आजघडीला सुमारे ६५० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. पालिका स्थापन झाल्यापासून डम्पिंगचा प्रश्न काही सुटलेला नाही. १० वर्षांपूर्वी डायघर येथे पालिकेने शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. परंतु, स्थानिकांचा विरोध झाल्याने पालिकेला हा प्रकल्प अर्ध्यावरच गुंडाळावा लागला. त्यानंतर, कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न पुढे आला. त्यानुसार, कधी गायमुख, कधी खर्डी, कधी वागळे असा प्रवास करून सध्या दिवा भागात कचरा डम्प केला जात आहे. परंतु, आता येथील डम्पिंगलादेखील विरोध वाढू लागल्याने पालिकेने पुन्हा डायघरकडे धाव घेण्यास सुरुवात केली.
एक वर्षापूर्वी पालिकेने डायघर येथे कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रि या करण्याचा निर्णय घेतला आहे. कचऱ्याची दुर्गंधी बाहेर जाऊ नये म्हणून निगेटिव्ह प्रेशर या नव्या प्रणालीचा वापर करण्याबरोबरच कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. मात्र, यासाठी सात कोटींचा अधिकचा बोजा पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. या प्रकल्पाविषयीची संपूर्ण माहिती गावकऱ्यांना पालिकेने बैठका घेऊन दिली होती. त्यांचे मतपरिवर्तन करण्याचाही प्रयत्न झाला होता. परंतु, पालिकेचा हा प्रयत्न असफल ठरला आहे.
असे असतानादेखील आता पालिका नवा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यासंदर्भात संबंधित ठेकेदाराशी करारनामा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. परंतु, पहिल्या प्रकल्पावरदेखील अशाच प्रकारे कोट्यवधींचा खर्च केला होता. तो प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आला आहे. आजघडीलादेखील स्थानिकांचा विरोध असल्याने हा प्रकल्पसुद्धा कागदावर राहण्याची चिन्हे असल्याने पालिकेने तळोजाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)