लोकप्रतिनिधीचे कर्तव्य बजावले

By Admin | Updated: November 27, 2015 03:04 IST2015-11-27T03:04:35+5:302015-11-27T03:04:35+5:30

‘बिल्डर सूरज परमार कॉसमॉस ग्रुपचे भागीदार होते. कॉसमॉस ग्रुपने अनेक भूखंड बेकायदा गिळंकृत केले होते. लोकप्रतिनिधी म्हणून ही कामे ठाणे महापालिकेच्या लक्षात आणून दिली

The duty of the Representative to be performed | लोकप्रतिनिधीचे कर्तव्य बजावले

लोकप्रतिनिधीचे कर्तव्य बजावले

मुंबई : ‘बिल्डर सूरज परमार कॉसमॉस ग्रुपचे भागीदार होते. कॉसमॉस ग्रुपने अनेक भूखंड बेकायदा गिळंकृत केले होते. लोकप्रतिनिधी म्हणून ही कामे ठाणे महापालिकेच्या लक्षात आणून दिली आणि कारवाईची मागणी केली. त्यामुळे आम्ही आत्महत्या करण्यास भाग पाडले, असे म्हणता येणार नाही,’ असा पवित्रा या
प्रकरणी आरोप असलेल्या चार नगरसेवकांनी गुरुवारी उच्च न्यायालयात घेतला.
परमार यांनी ७ आॅक्टोबरला आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत ठाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे, काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि अपक्ष सुधाकर चव्हाण यांच्या नावांचा उल्लेख केला होता. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर न्या. अजय गडकरी यांच्यापुढे सुनावणी होती.
ज्या व्यक्तींचे नावे खोडली आहेत, त्यांच्यावर कारवाई करणे, बेकायदा आहे, असा युक्तिवाद जगदाळे व मुल्ला यांच्या वतीने ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी उच्च न्यायालयात केला.
‘कॉसमॉस ग्रुपच्या अनेक इमारती बेकायदा आहेत. त्यामुळे काही इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले नव्हते. परिणामी, परमार फ्लॅटचा ताबा देऊ शकत नव्हते. त्यामुळे ठाण्यात त्यांची बदनामी होत होती, तसेच त्यांचे २१५ कोटी रुपयांचे नुकसानही झाले होते. त्यांच्या चिठ्ठीमध्ये राज्य सरकारच्या बांधकाम धोरणाविषयी, अनेक राजकीय पुढारी, महापालिकेचे अधिकारी यांच्याविषयीही तक्रार केली आहे. अखेरीस त्यांनी या सर्व त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येस चार नगरसेवक जबाबदार नाहीत,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. गुप्ते यांनी केला. शुक्रवारीही हा युक्तिवाद सुरू राहणार आहे, तोपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)
शाळेच्या भूखंडाचा बेकायदा वापर
कॉसमॉसचे एक बांधकाम शाळेसाठी राखीव भूखंडावर करण्यात आले आहे, तर दुसरे आदिवासींसाठी राखीव भूखंडावर करण्यात आले आहे. महापालिकेने काम थांबवण्याची नोटीस बजावली. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही बेकायदा कामे महापालिकेच्या निदर्शनास आणली आणि कारवाईची मागणी केली. महापालिकेनेही कारवाई केली, असेही अ‍ॅड. गुप्ते यांनी म्हटले.
१५ बिल्डर्सची कामे बेकायदा
न्या. गडकरी यांनी ‘महापालिकेच्या सभागृहात केवळ परमार यांच्याविरुद्ध तक्रार केली जात होती का,’ अशी विचारणा केली. त्यावर अ‍ॅड. गुप्ते यांनी १५ बिल्डर्सच्या बेकायदा बांधकामांविरुद्ध महापालिकेत आवाज उठवल्याचे सांगितले.

Web Title: The duty of the Representative to be performed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.