दत्त यांचा धक्कादायक पराभव!
By Admin | Updated: May 17, 2014 02:35 IST2014-05-17T02:35:47+5:302014-05-17T02:35:47+5:30
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांना धूळ चारत प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या भाजपाच्या उमेदवार पूनम महाजन यांनी सर्वार्थाने ही निवडणूक जिंकली आहे.

दत्त यांचा धक्कादायक पराभव!
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांना धूळ चारत प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या भाजपाच्या उमेदवार पूनम महाजन यांनी सर्वार्थाने ही निवडणूक जिंकली आहे. महत्त्वाचे म्हणजे पूनम यांनी तब्बल ४ लाख ७८ हजार ५३५ मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारासह उर्वरित राजकीय पक्षांच्या उमेदवारांनाही या विजयाने चक्क तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले आहे. मुळात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर मागील दहाएक वर्षांपासून दत्त कुटुंबीयांचे वर्चस्व होते. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांना ते राखता आले नाही. भाजपाने दत्त यांच्या विरोधात पूनम महाजन यांना उमेदवारी दिली, तर आम आदमी पक्षाने फिरोज पालखीवाला यांना उमेदवारी दिली आणि सपाने फरहान आझमी यांना संधी देत तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आप आणि सपासारखे तगडे पक्ष असतानाही महायुती आणि आघाडी या दोन पक्षांमध्ये खरी स्पर्धा होती. यात आघाडीच्या प्रिया यांच्या प्रचारासाठी नसीम खान आणि कृपाशंकर सिंग या दिग्गजांनी जीवाचे रान केले. शिवाय आमदार कृष्णा हेगडे यांनीदेखील प्रचार शिगेला पोहोचविला. दुसरीकडे फरहान आझमी यांच्या प्रचारासाठी सपाचे दिग्गज नेते मैदानात उतरले आणि त्यांंनी इथल्या झोपड्या पालथ्या घातल्या. भाजपाच्या पूनम महाजन यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि पराग अळवणी यांनीही मैदान लढविले. आणि सर्वात मोठा फॅक्टर ठरला तो येथे झालेल्या भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभा. मुळात प्रिया दत्त येथील झोपडपट्टीतील प्रचारात मागे पडल्या. त्यांनी केलेला प्रचार आणि प्रसार वरवरचा ठरला. याचाच फायदा पूनम महाजन यांनी घेतला आणि झोपडपट्टीतील मतदारांना आपल्याकडे आकर्षित केले. परिणामी याचा एक भाग म्हणून या मतदारसंघातील सर्वच विधानसभा क्षेत्रांवर भाजपाचे वर्चस्व राहिले.