धूळ पेरणीला सुरु वात

By Admin | Updated: May 18, 2015 22:40 IST2015-05-18T22:40:10+5:302015-05-18T22:40:10+5:30

मान्सून अंदमान-निकोबार द्विपसमूह ओलांडून बंगालच्या उपसागरापर्यंत आल्याची शुभवार्ता वेधशाळेने दिल्याने शेतकरी शेताकडे धाव घेऊ लागलाय.

The dust started sowing | धूळ पेरणीला सुरु वात

धूळ पेरणीला सुरु वात

पेण : मान्सून अंदमान-निकोबार द्विपसमूह ओलांडून बंगालच्या उपसागरापर्यंत आल्याची शुभवार्ता वेधशाळेने दिल्याने शेतकरी शेताकडे धाव घेऊ लागलाय. खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून सबंध रायगड जिल्ह्यातील शेतकरी धूळ पेरण्यांना प्रारंभ करतो. यावर्षी वेळेअगोदर मान्सूनचे आगमन होत असल्याने रायगडातील एकूण भात लागवड असलेल्या १ लाख १३ हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर धूळ पेरणी होणार आहे.
रायगड जिल्ह्याला कृषी क्षेत्राचे भांडार म्हटले जाते. अपार कष्ट करणाऱ्या शेतकरी राजाला खरीप हंगाम म्हणजे कुबेराचे भांडार वाटतं. संकटावर मात करून बेडर वृत्ती व अपार कष्ट करून शेतकरी ताठ उभा आहे. गत चार वर्षांचा मागोवा घेतल्यास रायगडातील औद्योगिक प्रकल्पामुळे ११ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीची घट झाली आहे. २०१० साली लागवडीचे क्षेत्र, १ लाख २४ हजार २०० हेक्टर, २०११ मध्ये ३०० हेक्टरची वाढ होऊन १ लाख २४ हजार ५०० हेक्टर , २०१२ मध्ये लागवड क्षेत्रात ८०० हेक्टरची घट होऊन १ लाख २३ हजार ७०० हेक्टर, २०१३ मध्ये ९ हजार २०० हेक्टर क्षेत्र घटून ते १ लाख १४ हजार ५०० हेक्टर झाले तर गतवर्षी २०१४ मध्ये १ लाख १३ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यावर्षीही तेवढेच क्षेत्र लागवडीखाली येणार असून हा या एकूण क्षेत्रापैकी निम्मे म्हणजे ५६ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर धूळ पेरण्यांना प्रारंभ होतो.
खरीप हंगामाची तयारी शासनाने वेळेपूर्वीच केली असून जिल्ह्यासाठी १८ हजार क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. जिल्हा कृषी विभागाने ३१ हजार मेट्रीक टन खतांची मागणी केली असून यापैकी २ हजार ४५९ मेट्रीक टन खत पुरवठा झालेला आहे. यावर्षी खतांची टंचाई भासणार नाही, असे कृषी विभागाने खरीपपूर्व आढावा बैठकीमध्ये स्पष्ट केले आहे. या शिवाय नैसर्गिक आपत्तीसाठी पेरणी हंगामानंतर तब्बल एक कोटी रुपयांची विशेष तरतूद केलेली आहे. प्रसंगानुरुप यामधून शेतकऱ्यांना बी-बियाणे वाटप करण्याचा राजिपचा निर्धार आहे. थेट बांधापर्यंत खत मिळावे यासाठी ६ हजार २२० मेट्रीक टन खतपुरवठा यावर्षी करण्यात येणार आहे. (वार्ताहर)

४एकंदरीत मान्सूनपूर्व खरीपाचा पेरा म्हणून सध्या धूळ पेरण्यांची लगबग सुरु आहे. शेतीसाठी आधुनिक व संकरित कृषी वाणांचे शाश्वत उत्पन्न देणारे १३७ व्हरायटीचे बियाणे कृषी केंद्रावर उपलब्ध आहे. बियाणांच्या किमतीमध्ये वाढ नाही, मात्र प्रतिकिलो ४५ ते ९० रुपये या दरम्यानची तयार केलेली बियाणे व घरची बियाणे अशा दोन्ही बियाणांचा सर्रास वापर शेतकरी करत आहे. मात्र खरीप हंगामाच्या तयारीत मान्सूनपूर्व सरी पडल्यास ती धोक्याची घंटा ठरु शकते. तरीही आकाशातील पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती सध्या जुगार ठरत असूनसुध्दा शेतकऱ्यांना हा खेळ दरवर्षी मांडावा लागतोच.

४मान्सूनची वाटचाल व प्रगतीत अनुकूल स्थिती लाभल्याने मेघांचा वर्षाव व नक्षत्रांचं देणे लाभल्यावर शेतकरी आपल्या कामाला सुरूवात करतो. गेले वर्षभर शेतात कष्ट करणारे लाखो हात पावसाच्या आगमनाच्या शुभसंकेताने मनोमन सुखावले आहेत. मान्सूनच्या आगमनापूर्वी दहा दिवस आधी पेरलेले बियाणे भिजून ओलेचिंब झाल्यावर त्याला अंकुर फुटतात व चांगले वाफे तयार होतात. हीच शेतकऱ्याची पारंपरिक धूळ पेरणीची पध्दत आहे.

Web Title: The dust started sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.