Join us  

पोलिस होण्यापूर्वीच बेड्या! भरती परीक्षेदरम्यान चार कॉपी बहाद्दरांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 5:47 AM

कॉपीसाठी वापरल्या युक्त्या

मुंबई :  मुंबईपोलिस दलात सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान रविवारी लेखी परीक्षा पार पडली. या परीक्षेदरम्यान उमेदवारांनी कॉपीसाठी वेगवेगळी शक्कल लढविल्याचे दिसून आले. त्यामुळे खाकी वर्दी चढण्यापूर्वीच या उमेदवारांना कोठडीची हवा खाण्याची वेळ ओढवली आहे. मुंबईत लेखी परीक्षेदरम्यान परीक्षार्थीकडून झालेल्या गैरप्रकाराच्या अनुषंगाने मुंबईसह जालना, औरंगाबाद, बीडमधील उमेदवाराविरुद्ध चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील २१३ केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा झाली. या परीक्षेला ७८ हजार ५२२ परीक्षार्थी उपस्थित होते. परीक्षेसाठी १२४६ पोलिस अधिकारी आणि ५९७५ पोलिस अंमलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या बंदोबस्तावर पोलिस आयुक्त, विशेष पोलिस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासन विभागाचे सह आयुक्त यांचा वॉच होता. 

परीक्षेदरम्यान चार केंद्रावर कॉपी करणाऱ्या उमेदवारांना वेळीच ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पूर्व उपनगरातील भांडुप तर, पश्चिम उपनगरातील कस्तुरबा मार्ग, मेघवाडी आणि गोरेगाव पोलिस ठाणे येथे प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. 

भांडुप - भांडुपमधील व्हिलेज रोडवर असलेल्या ब्राईट स्कूल या परीक्षा केंद्रावर जालना येथील परीक्षार्थी बबलू मदनसिंग मेंढरवाल (२४) यांच्या संशयास्पद हालचाली पर्यवेक्षक पोलिसाने हेरल्या. तपासणीमध्ये मेंढरवाल हा कानात बसविलेल्या सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर करून कॉपी करताना सापडला. त्याने एक डिव्हाइस पँटमध्ये लपवले होते आणि यात तो प्रितम गुसिंग याची मदत घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी बबलू याला अटक करण्यात आली असून साथीदाराचा शोध सुरू असल्याचे भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन उन्हवणे यांनी सांगितले.

जोगेश्वरी : जोगेश्वरी पूर्वेकडील परीक्षा केंद्रावर बीडमधील परीक्षार्थी नितेश आरेकर (२९) हा त्याचा मित्र अशोक ढोले याची मदत घेऊन पेपर सोडवत होता. आरेकर यानेही अशाचप्रकारे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा आधार घेत कॉपी करताना आढळून आला. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी आरेकर आणि ढोले विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरेकरला ताब्यात घेत त्याला ४१ अ ची नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

पेनमध्ये सिमकार्ड 

बोरिवली - बोरिवली येथील केंद्रावर वरळीतील रहिवासी रवींद्र काळे (३३) हा त्याच्या जवळील पेनामध्ये असलेल्या सिमकार्डच्या मदतीने कानात इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवून त्याच्या मित्राची मदत घेऊन पेपर सोडविताना आढळून आला. याप्रकरणी काळे याच्यासह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हणून मनगटापासून ते कोपरापर्यंत सनग्लोव्ह्ज 

गोरेगाव - येथील परीक्षा केंद्रावर औरंगाबादमधील परीक्षार्थीं युवराज धनसिंग जारवाल (१९) हा बेकायदेशीरपणे परीक्षा हॉलमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आणून त्याच्या मदतीने अज्ञात व्यक्तीसोबत संपर्क साधून कॉपी करताना सापडला. जारवाल यांच्या डाव्या कानामध्ये ईलेक्ट्रिक इअरबड मिळून आले. तसेच त्याच्या उजव्या हातामध्ये मनगटापासून ते कोपऱ्यापर्यंत सनग्लोव्ज व त्यामध्ये सिमकार्ड चार्जिंग सोकेट मायक्रो माइक असलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मिळून आले. तो यामार्फतच, पेपर सोडवत असल्याचे स्पष्ट होताच त्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून कानात बसवलेले मायक्रो माईक उपकरण, सिमकार्ड, चार्जिंग प्लेट, सनग्लोव्हज जप्त करण्यात आले आहे. 

टॅग्स :मुंबईपोलिस