Join us

"भाद्रपद गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी नाही"; पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:08 IST

माघी गणेशोत्सवाचा वाद संपलेला नसताना महापालिकेने भाद्रपदातील गणेशोत्सवासाठी कठोर पावलं उचलली आहेत.

Mumbai Maghi Ganpati Visarjan 2025 :मुंबई उपनगरात माघी गणेशोत्सवानिमित्ताने स्थापन करण्यात आलेल्या गणेश मूर्तींच्या विसर्जनावरुन मोठा पेच निर्माण झाला आहे. माघी गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यास पालिकेने नकार दिल्यामुळे आता विसर्जन कुठे करायचे असा प्रश्न मंडळांपुढे निर्माण झाला आहे. अशातच आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही पीओपी मूर्तींना परवानगी नसणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्थापन करण्यात आलेल्या पीओपी मूर्ती विसर्जनाचा तिढा कायम आहे. माघी गणपतीच्या विसर्जनासाठी पालिकेने मंडळांना कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र १४ ते १५ फुटाच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात कसं करायचं असा सवाल मंडळांनी केला. ११ फेब्रुवारीला कांदिवलीतून मोठ्या प्रमाणावर मिरवणूका काढण्याचा इशारा पीओपी मूर्तीकारांनी व मंडळांनी दिला आहे. पालिकेने मात्र मंडळांना समुद्रात मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घातली आहे.

मात्र आता माघीतील हा वाद भाद्रपद गणेशोत्सवापर्यंतही वाढू शकतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान साजरा होणाऱ्या मुख्य गणेशोत्सवादरम्यान, कोणत्याही पीओपी मूर्तींना परवानगी दिली जाणार नसल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. "त्या काळात पीओपी मूर्तींचे उत्पादन, विक्री आणि विसर्जन हे ३० जानेवारीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असेल. यावेळी आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती टाळायची आहे म्हणून आम्ही विसर्जनाला परवानगी देत आहोत. मात्र मूर्तीकारांनी आम्हाला आश्वासन दिले होते की यावेळी ते फक्त मातीच्या मूर्ती बनवतील," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

"मुंबईत उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे आणि कोणत्याही मंडळाने त्याचे उल्लंघन करू नये. आम्ही कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनासाठी आवश्यक असलेल्या सर्व व्यवस्था करत आहोत. आम्ही आयोजकांना पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यास सांगत आहोत, असेही महापालिका अधिकाऱ्याने म्हटलं.

दरम्यान, पीओपीच्या गणपतीच्या मूर्ती तयार करणे, विक्री करणे आणि विसर्जन करण्यावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातली होती. त्यामुळे, माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका आणि त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश कोर्टाने ३० जानेवारी रोजी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना दिले होते. मात्र त्याआधीच मोठ्या मंडळांनी पीओपीच्या गणेश मूर्ती मंडपात आणल्या होत्या. सातव्या दिवशी उपनगरांमधील मंडळांनी मार्वे किनाऱ्यांवर मूर्ती विसर्जनासाठी नेल्या होत्या. मात्र पोलीस प्रशासनाने आणि पालिकेने त्यांना रोखलं. यामुळे मंडळांना पुन्हा गणेशमूर्ती मंडपांत आणाव्या लागल्या होत्या. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकागणेश चतुर्थी २०२४