दुर्गाला शाबासकी, सूरज दुर्लक्षितच
By Admin | Updated: July 13, 2015 02:38 IST2015-07-13T02:38:07+5:302015-07-13T02:38:07+5:30
जागतिक शालेय अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या अॅथलिट दुर्गा देवरेने १,५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या सुवर्ण कामगिरीमुळे

दुर्गाला शाबासकी, सूरज दुर्लक्षितच
महेश चेमटे , मुंबई
जागतिक शालेय अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या अॅथलिट दुर्गा देवरेने १,५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या सुवर्ण कामगिरीमुळे शाबासकीची थाप क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दुर्गाला दिली. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धेत सूरज ऊर्फ नामदेव कोकाटेने सुवर्णपदक मिळवले, त्याचे साधे कौतुक करण्यासदेखील क्रीडामंत्र्यांना वेळ नाही.
आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा मल्ल सूरज ऊर्फनामदेव राजकुमार कोकाटेने फ्री स्टाइल कुस्ती प्रकारात (६३ किलो वजनी गट) सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत भारतीय संघाने १२ सुवर्ण, १० रौप्य, १४ कांस्य पदकांसह ३६ पदकांची लयलूट केली. इराण, कझाकिस्तान व मंगोलियन मल्लांना आस्मान दाखवत सूरजने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे या सर्व कुस्त्यांमध्ये त्याने प्रतिस्पर्धी मल्लांना चीतपट करीत हा विजय मिळवला. या सुवर्ण कामगिरीला तब्बल एक महिना उलटला, पण आजपर्यंत क्रीडा मंत्र्यांनी याची साधी दखलदेखील घेतलेली नाही. नाशिकच्या दुर्गा देवरेने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. यात शंका नाही, पण सूरजसारख्या आर्थिक संकटांचा सामना करून मार्ग काढत त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. क्रीडा मंत्रालयाकडून महिनाभरात त्याला साधे अभिनंदनाचे पत्रही जाऊ नये, यापेक्षा या कुस्तीपटूची शोकांतिका आणखी काय असू शकते. विजयी होऊन पुण्याला परतल्यानंतर कोणताही क्रीडा अधिकारी त्याच्या स्वागतासाठी आला नव्हता. त्याचे प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि त्याचे सहकारी यांनी त्याचे स्वागत केले. इतकेच नव्हे तर स्पर्धेला जाण्यासाठी काका पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला आर्थिक मदत केली. सूरजलाही दुर्गाप्रमाणे शाबासकी कधी मिळणार, याचाच विचार सर्वत्र केला जात आहे.