अर्बन हाटमध्ये दुरवस्थेचे प्रदर्शन
By Admin | Updated: January 15, 2015 02:08 IST2015-01-15T02:08:49+5:302015-01-15T02:08:49+5:30
शहराला सांस्कृतिक चेहरा मिळावा यासाठी सिडकोने कोट्यवधी रुपये खर्च करून बेलापूर येथे उभारलेल्या अत्याधुनिक अर्बन हाटची नियमित देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे

अर्बन हाटमध्ये दुरवस्थेचे प्रदर्शन
पूनम गुरव, नवी मुंबई
शहराला सांस्कृतिक चेहरा मिळावा यासाठी सिडकोने कोट्यवधी रुपये खर्च करून बेलापूर येथे उभारलेल्या अत्याधुनिक अर्बन हाटची नियमित देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हातमाग कारागिरांना आणि ग्राहकांना येथील असुविधेचा फटका बसत आहे.
केंद्राचे वस्त्रोद्योग, हस्तकला मंत्रालय आणि सिडकोच्या संयुक्त विद्यमाने बांधलेल्या अर्बन हाटची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. २०१० पासून प्रदर्शनासाठी खुले करण्यात आलेल्या अर्बन हाटच्या निर्मितीसाठी एकूण ७.७५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र सिडको अर्बन हाट व्यवस्थापकीय विभाग प्राथमिक सुविधेकडे दुर्लक्ष करत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील हातमाग व्यापारी, बचत गट, ग्रामोद्योग आदि कलाकार यांच्या व्यवसायाला चालना मिळावी, हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी अर्बन हाटमध्ये प्रदर्शने भरविण्यात येतात. याठिकाणी प्राथमिक सुविधेच्या अभावामुळे व्यापारी आणि ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जवळपास १२ एकरमध्ये वसलेल्या अर्बन हाटमध्ये प्रदर्शनासाठी ५० गाळांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी यातील काही गाळे कायमस्वरूपी बंदच असतात. तर प्रदर्शन संपल्यानंतर यातील काही दुकाने उघडीच राहत असून टेबल, खुर्च्या बाहेर पडलेल्या असतात. अनेक व्यापाऱ्यांनी प्रदर्शनातील साहित्य दर्शनी भागात ठेवल्यामुळे अडगळ निर्माण झाली आहे. प्रदर्शनादरम्यान अर्बन हाटमध्ये प्रसन्न वातावरणासाठी संपूर्ण परिसरामध्ये तीन कारंजे उभारण्यात आले आहेत. पण देखभालीअभावी तिन्ही कारंजांची दुरवस्था झाली आहे. दोन्ही कारंजांमध्ये अनेक दिवसापासून पाणी साचले असून उग्र वासही येत आहे. अर्बन हाटच्या प्रवेशद्वाराजवळील कारंजा गेल्या काही महिन्यांपासून बंदच पडलेला आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या सहा पाणपोया आणि थंड पाण्याचे कुलर फक्त नावापुरतेच राहिले आहेत. जवळपास सर्वच कुलर बंद असून पाणपोईची दुरवस्था झाली आहे. अर्बन हाटमध्ये रोषणाई करण्यासाठी विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या डीपी बॉक्सची झाकणे गायब झाली आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रदर्शनादरम्यान परिसरामध्ये निर्माण होणारा कचराही वेळेवर उचलण्यात येत नसल्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
सिडकोच्या वतीने गेल्या वर्षभरामध्ये विविध प्रकारची २२ प्रदर्शने भरविण्यात आली आहेत. या प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या व्यापाऱ्यांकडून सिडको भाडे आकारते. मात्र त्यानुसार सिडकोकडून व्यापाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. त्याचबरोबर प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी असल्याने व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी अर्बन हाटमधील प्रदर्शनाकडे पाठ फिरवली.