पुण्यातील सराईत दुकली मुंबई पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST2021-02-05T04:28:08+5:302021-02-05T04:28:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुण्यात हत्येचा प्रयत्न, मारामारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्यासारखे गंभीर गुन्हे नोंद असलेला सराईत गुन्हेगार कारागृहातून ...

पुण्यातील सराईत दुकली मुंबई पोलिसांच्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यात हत्येचा प्रयत्न, मारामारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्यासारखे गंभीर गुन्हे नोंद असलेला सराईत गुन्हेगार कारागृहातून बाहेर पडताच शस्त्रासह मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सूरज अशोक ठोंबरे आणि गणेश अर्मोगम पन्नडी अशी अटक करण्यात आलेल्या दुकलीची नावे आहेत.
भक्ती पार्क परिसरात ३० जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भारती व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस शिपाई संदीप जाधव, रवी लोहारे, अक्षय मांदळे, नीलेश कांबळे, उद्धव राख, नितीन चोपडे गस्त घालत असताना, एक कार संशयास्पद स्थितीत आढळून आली. त्यांनी कार जवळ जाताच चालकाने कार चालू करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने त्याला पकडून ताब्यात घेतले. यात, सूरज अशोक ठोंबरे आणि गणेश अर्मोगम पन्नडी पोलिसांच्या हाती लागले. त्याच्याकडून पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
सूरज विरोधात, पुण्यातील समर्थ, फरासखाना पोलीस ठाण्यात एकूण ७ गुन्हे नोंद आहेत. हत्येचा प्रयत्न, मारामारी, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. २०१९ मध्ये त्याला अटक करून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली हाेती. त्याच्यावर तडीपारीचीही कारवाई करण्यात आली आहे, तर गणेश विरुद्धही फारसखाना पोलीस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. त्यांच्याकडे याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
.................