Join us  

Andheri Bridge Collapse: मोटरमनचं प्रसंगावधान; त्यानं वेळीच ब्रेक लावला नसता तर अघटित घडलं असतं !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 2:23 PM

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर पूल कोसळून झालेल्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालीय.

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर पूल कोसळून झालेल्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालीय. परंतु या अपघातात मोटरमनच्या प्रसंगावधानानं मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. खरं तर प्रवाशांसाठी मोटरमन देवदूत बनून आला आहे. जर त्या पुलाचा भाग एखाद्या लोकलवर कोसळला असता, तर एलफिन्स्टनसारखी दुर्घटना घडण्यासाठी वेळ लागला नसता. 

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूल दुर्घटनेदरम्यान चंद्रशेखर सावंत या मोटरमननं इमर्जन्सी ब्रेक लावला. त्यामुळे लोकलमधले शेकडो प्रवासी थोडक्यात बचावले. ही ट्रेन बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेनं जात होती. ही दुर्घटना झाली त्यावेळी लोकल अपघातग्रस्त ठिकाणापासून 50 मीटरच्या अंतरावर होती. ट्रेनमधल्या मोटरमननंही या घटनेचा वृत्तांत सांगितला आहे.जेव्हा मी पाहिलं पादचारी पुलाचा काही भाग कोसळतोय. त्यावेळी मी होतो तिकडेच इमर्जन्सी ब्रेक मारला. त्यामुळे लोकलमधून प्रवास करणा-या शेकडो प्रवाशांचा जीव वाचला, अशी माहिती मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी दिली आहे. चंद्रशेखर  हे जवळपास 27 वर्षांपासून रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून कार्यरत आहेत.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर म्हणाले, पूल कोसळल्यानं ओव्हरहेड वायर तुटून ढिगा-याखाली दबली असून, रेल्वेच्या अभियंत्यांची एक टीम लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेची सेवा खंडित झाली आहे. आमचे अधिकारी  घटनास्थळी पोहोचले असून, परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. आपत्कालीन विभाग अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या मदतीनं ढिगारा उपसण्याचं काम करत आहे.  

टॅग्स :रेल्वे