Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुळ प्रसरणामुळे मध्य रेल्वेवर रोज २५ मिनिटांचा ‘स्पीड ब्रेकर’; दुपारचे वेळापत्रक बिघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 07:30 IST

ऐन उकाड्यात प्रवाशांचा खोळंबा, काही ठिकाणी लोकल प्लॅटफॉर्मवरच थांबवून ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुंबई - मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर सध्या घेतल्या जाणाऱ्या दुपारच्या ‘डिस्ट्रेसिंग ब्लॉक’मुळे उपनगरी लोकल सेवांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दररोज दुपारी साधारण २ ते अडीच तास अनेक गाड्या उशिराने धावत असून, प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे रुळांचे प्रसरण (एक्स्पान्शन) होते. यामुळे ट्रॅकची सुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून ‘डिस्ट्रेसिंग’ प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत रुळांची अलाईनमेंट तपासून त्यातील ताण कमी केला जातो. मात्र, ही देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू असताना लोकलचे मार्ग बदलावे लागत असून, वेग कमी केला जातो. यामुळे वेळापत्रक कोलमडते. दरम्यान, या कामासाठी ३५ ते ४० अंश तापमान असणे आवश्यक असल्याने हे काम दुपारी १ ते साडेतीनच्या दरम्यान सीएसएमटी - कल्याण दरम्यान प्रत्येक १० ते १५ किमीच्या अंतरावर सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

प्रत्यक्षात, सीएसएमटी–कल्याण मार्गावर दुपारच्या सत्रात प्रवाशांची संख्या कमी असली, तरी कार्यालयीन वेळा बदललेल्या आणि शिफ्टमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांसाठी ही वेळ महत्त्वाची ठरते. सध्या या कालावधीत लोकल सरासरी २० ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. काही ठिकाणी लोकल प्लॅटफॉर्मवरच थांबवून ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

‘सुरक्षिततेसाठी उपाय आवश्यक’मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असून, उन्हाळ्यातील उष्णतेमुळे ट्रॅक बकलिंगसारख्या घटना टाळण्यासाठी हा उपाय केला जात आहे. कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात असून, लवकरच परिस्थिती सुरळीत  होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘अचूक वेळापत्रक गरजेचे’तज्ज्ञांच्या मते, मुंबई उपनगरी रेल्वे ही देशातील सर्वाधिक व्यस्त नेटवर्कपैकी एक असल्याने अशा देखभाल कामांचा थेट परिणाम सेवांवर होतो. त्यामुळे प्रवाशांना आधीच सूचना देणे, अचूक वेळापत्रक जाहीर करणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, उन्हामुळे सध्यातरी दुपारच्या सत्रात प्रवास करणाऱ्या नागरिकांना उशिराचा सामना करावा लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Track Expansion Delays Central Railway, Disrupting Afternoon Schedule

Web Summary : Afternoon track maintenance on the Central Railway's busy CSMT-Kalyan route causes 25-minute delays. Track expansion due to heat necessitates 'distressing,' impacting schedules and inconveniencing passengers, especially those with altered office hours. Railway officials emphasize safety measures, promising eventual normalcy.
टॅग्स :मध्य रेल्वे