Join us

कुशल मनुष्यबळ अभावी ‘आयसीयू’ पुन्हा खासगी संस्थांकडे; BMC काढणार निविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 06:24 IST

नवीन संस्थेला देण्यात येणाऱ्या कामांमध्ये सुस्पष्टता आणली जाणार आहे. दोन ते तीन महिन्यांत या कामांची निविदा काढली जाणार आहे.

मुंबई - महापालिकेच्या अखत्यारीतील उपनगरीय रुग्णालयाचे अतिदक्षता विभागाची (आयसीयू) जबाबदारी पुन्हा एकदा खासगी संस्थांना देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहेत. गेल्या वेळी अशाच पद्धतीने खासगी संस्थांना आयसीयू सांभाळण्याचे काम देण्यात आल्याने अनेक तक्रारींना प्रशासनाला सामोरे जावे लागले होते. 

गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांचा वाढता ताण लक्षात घेता उपनगरीय रुग्णालयातही मोठ्या आजारांवर उपचार केले जात आहेत. मात्र तेथे आयसीयूच्या व्यवस्थापनासाठी पुरेसे कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे हे काम खासगी संस्थांना दिले जाणार आहे. 

संस्थेची सेवा थांबविण्याचा निर्णय

१६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये प्रतिवर्षी ४२ लाखांहून अधिक रुग्ण ओपीडीत, तर अडीच लाखांहून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल होत असतात; तर ४२,००० अधिक शस्त्रक्रिया या ठिकाणी केल्या जातात. काही वर्षांपूर्वी एका खासगी संस्थेला आयसीयू सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे डॉक्टरसुद्धा नियुक्त केले होते. मात्र काही वेळा डॉक्टर वेळेवर उपस्थित नसणे, अटी-शर्तींप्रमाणे डॉक्टरांची नियुक्ती नसणे, त्यासोबत रुग्णांनी डॉक्टरांकडून व्यवस्थित उपचार होत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने त्या संस्थेची सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला होता.

कामांमध्ये सुस्पष्टता येणार   

उपनगरीय रुग्णालयाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, उपनगरीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच डॉक्टरांची गरज असल्याने खासगी संस्थेला काम देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ज्या संस्थेला काम देण्यात आले होते, तिच्याविरोधात काही तक्रारी होत्या. मात्र नवीन संस्थेला देण्यात येणाऱ्या कामांमध्ये सुस्पष्टता आणली जाणार आहे. दोन ते तीन महिन्यांत या कामांची निविदा काढली जाणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका