त्या २७ गावांंमुळे महापालिकेच्या वॉर्डातही १२-१५ ने भर पडणार!
By Admin | Updated: May 16, 2015 22:56 IST2015-05-16T22:56:09+5:302015-05-16T22:56:09+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २००१ मध्ये वगळलेली ती २७ गावे पुन्हा महापालिका हद्दीत येणार असून त्यामुळे युतीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

त्या २७ गावांंमुळे महापालिकेच्या वॉर्डातही १२-१५ ने भर पडणार!
अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवली
कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २००१ मध्ये वगळलेली ती २७ गावे पुन्हा महापालिका हद्दीत येणार असून त्यामुळे युतीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकींचा निकाल बघता या ठिकाणी निवडून आलेल्या युतीच्या - शिवसेनेच्या उमेदवारांना जी मते मिळाली आहेत त्यावरुन आगामी आॅक्टोबर महिन्यात होणा-या महापालिकेच्या निवडणूकांमध्ये युतीचे पारडे जड होणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट आहे. असले तरीही त्याचा लाभ शिवसेनेला होणार की भाजपाला ही राजकीय गणिते आता रंगवण्यात येत आहेत. भाजपाच्या दृष्टीने विकासासाठी ही गावे महापालिकेत आली याचा आनंद असला तरीही शिवसेनेच्या दृष्टीने पारडे जड होणार याकडे लक्ष देण्यात येत असल्याचे शनिवारच्या राजकीय चर्चांमध्ये दिसून आले. विरोधक पक्षांना मात्र युतीचे पारडे आणखी जड होणार या भितीने धडकी भरली आहे.
गेली १५ हून अधिक वर्षे या महापालिकेवर युतीचेच वर्चस्व असून आगामी काळातही तेच राहील असा विश्वास युतीचे आमदार सुभाष भोईर, रवींद्र चव्हाण आणि नरेंद्र पवार यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केला. परंतू वगळलेली २७ गावे परत येण्याचा निर्णय होत असल्याने त्याचा लाभ शिवसेनेला होणार की भाजपाला असा सवाल सर्वच आमदारांना केला असता स्पष्टपणे कोणीही न बोलता केवळ यूतीलाच होईल असे सांगत वेळ मारुन नेली. तर संघर्ष समितीमधील फूट पडलेल्या ‘त्या’ नेत्यांनीही राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असल्याचे सांगण्यात आले.
ही गावे परत येत असल्याने त्या ठिकाणची लोकवस्ती वाढलेली असून सर्वसाधारणपणे १२-१५ वॉर्ड महापालिका निवडणूकीत वाढण्याची शक्यता असल्याचेही राजकीय जाणकारांनी सांगितले. या वाढलेल्या आणि आधीपासून वाढणा-या सुमारे १० वॉर्ड अशा अंदाजे २०-२३ वॉर्डांची विभागणी युतीत कशी होईल असा सवाल केल्यावर मात्र राजकीय लोकप्रतिनिधींनी सावध पवित्रा घेत महायुतीचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो शिरसावंद्य असे स्पष्ट केले.
या गावांमधील बहुतांशी गावे ही डोंबिवलीसह कल्याण शहरालगत आहेत, त्यामुळे येथून लाखोंच्या संख्येने नागरिक राजगारासह किरकोळ व्यापारासह खरेदीसाठी या शहरांमध्येच येतात. तसेच या ठिकाणाहूनच त्यांना दळणवळणाची साधने सोयीची आहेत. त्यामुळे एकीकडे ही गावे वगळलेली असली तरीही यांची नाळ मात्र या शहरांशी सर्वाधिक आहे. त्यामुळे ही गावे पुन्हा महापालिकेत येण्याच्या निर्णयामुळे राजकीय हेतू वगळता सर्वसामान्य नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण असल्याची चर्चा आहे.
हा पट्टा कल्याण - ग्रामीण भागात येत असून लोकसभा निवडणूकांच्या निकालात या ठिकाणी विरोधकांना युतीच्या (शिवसेनेच्या) खासदार श्रीकांत शिंदे यांना तब्बल ९०/९३ हजारांहून अधिक मते पडली होती, तसेच विधानसभा निवडणूकीतही या ठिकाणी कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर हे एकहाती निवडून गेले होते, परंतू त्यामध्ये भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षाने त्यांचा उमेदवारच उभा केलेला नव्हता हे देखिल लक्षात घेणे महत्वाचे असल्याचे जाणकार सांगतात. तसेच या मतदारसंघातून तब्बल ११ हजार मतदारांनी ‘नोटा’चा उपयोग करत उमेदवाराबाबत नापसंती दर्शवली होती. त्यामुळे ही ११ हजार मते भाजपाची असल्याचा दावा त्या पक्षाचे प्रतिनिधी करीत आहेत. असे असले तरीही या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व गेल्या २५ हून अधिक वर्षे आहे, हे वास्तव चित्र आहे.