अशुध्द पाणीपुरवठ्यामुळे सारसनमध्ये आजारांची साथ
By Admin | Updated: February 23, 2015 22:10 IST2015-02-23T22:10:49+5:302015-02-23T22:10:49+5:30
गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे येणारे पाणी दूषित असल्याने सारसनमध्ये प्रत्येक घरातील नागरिक आजारी आहे

अशुध्द पाणीपुरवठ्यामुळे सारसनमध्ये आजारांची साथ
खालापूर : गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे येणारे पाणी दूषित असल्याने सारसनमध्ये प्रत्येक घरातील नागरिक आजारी आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. साजगाव ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा सर्वत्र निषेध केला जात आहे. सुमारे २ कोटी रुपयांची पाणी योजना पूर्ण असतानाही ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने शुध्द पाणीपुरवठा केव्हा सुरू होईल, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सारसन येथे गेले काही दिवस दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सारसन येथे एका कंपनीच्या बाजूला मारलेल्या बोअरवेलमधून पाणी उचलून नळाद्वारे ग्रामस्थांना दिले जाते. हे पाणी गेल्या काही दिवसांपासून दूषित झाले आहे. पाण्यावर वेगळ्या प्रकारचा तवंग पहायला मिळत असून पाणी प्यायल्याने सारसनमध्ये अनेक ग्रामस्थ आजारी पडले आहेत. असे असताना ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. खोपोलीत सध्या काविळीच्या साथीने थैमान घातले असून दूषित पाण्यामुळे पसरलेली ही साथ पालिकेच्या बाजूलाच असलेल्या सारसनमध्येही येण्याची भीती व्यक्त होत आहे. सुरेश लाड यांच्या प्रयत्नाने सुमारे पावणे दोन कोटी रुपयांची पाणी योजना या ठिकाणी पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी घाई - घाईत या योजनेचे उद्घाटनही करण्यात आले होते, मात्र उद्घाटन करुन सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही ही योजना सुरु झालेली नाही. या योजनेचे पाणी सुरु झाले तर ग्रामस्थांना शुध्द पाणी पुरवठा होणार आहे, मात्र पूर्ण असलेल्या योजनेचे पाणी दिले जात नसल्याने ग्रामस्थांना अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. ग्रामस्थ शुध्द पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाठपुरावा करत असतानाही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. (वार्ताहर)