Join us  

मोटरमन संघटनेच्या आडमुठेपणामुळे मध्य रेल्वे 20 मिनिटे उशिराने; ओव्हरटाईमला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 9:21 AM

9 लोकलफेऱ्या रद्द, प्रवाशांना मनस्ताप, सुमारे 600 लोकल फेऱ्यांना फटका बसणार

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या मोटरमननी ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेला सकाळी 8 ते 9 दरम्यानच्या 9 लोकलफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. रिक्त जागा भरण्यासह इतर मागण्यांबाबतची बैठक काल, गुरुवारी फसल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक सुरू आहे.  मध्य रेल्वेच्या मोटरमननी 'एकला चलो रे आंदोलन' सुरू केले असून 26 मोटरमनवर होणारी कारवाई त्वरित मागे घ्यावी ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. हे आंदोलन सुरू राहिल्यास मुख्य, ट्रान्स हार्बर, हार्बर वरील सुमारे 600 लोकल फेऱ्यांना फटका बसणार आहे. 'वर्क टू रूल' या नियमांचे पालन करत केवळ एकच ड्युटी करण्याचा मोटरमन संघटनेने निर्णय घेतला आहे.   मध्यरेल्वेवर मोटरमनच्या जवळपास 283 जागा रिक्त आहेत. या जागा त्वरित भराव्यात. रिक्त जागांमुळे कामाची वेळ वाढत आहे. यामुळे काही चुका झाल्यास पहिली कारवाई मोटरमनवर होते. यासह इतर मागण्यांसंबंधी काल रेल्वेच्या अधिकारी आणि मोटरमन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने आज सकाळपासूनच मोटरमननी ओव्हरटाईम करण्यास नकार दिला आहे.   यामुळे ऐन गर्दीच्या वेळी लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असून सर्व स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, आज दुपारी पुन्हा रेल्वेच्या अधिकारी आणि मोटरमन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार असून ठोस आश्वासन मिळेपर्यंत ओव्हरटाईम करण्यास मोटरमननी नकार दिला आहे. 

टॅग्स :मध्य रेल्वेलोकलमुंबई लोकलरेल्वेरेल्वे प्रवासी