जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट
By Admin | Updated: July 6, 2015 22:29 IST2015-07-06T22:29:25+5:302015-07-06T22:29:25+5:30
गेल्या आठवडाभर पावसाने दडी मारल्याने शेतीची विविध कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यात ८० टक्के पेरणी पूर्ण झाली होती.

जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट
अलिबाग : गेल्या आठवडाभर पावसाने दडी मारल्याने शेतीची विविध कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यात ८० टक्के पेरणी पूर्ण झाली होती. त्यातच पावसाने डोळे वटारल्याने सुमारे २५ टक्के पिके करपली आहेत. पावसाची अवकृपा अशीच राहिल्यास त्याचा शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याच्या भीतीने बळीराजा हवालदिल झाला आहे. कृषी विभागाने तालुकास्तरावर बियाणे उपलब्ध करुन दिली आहेत.
जून महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावून सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. त्यांनी तातडीने शेतीच्या कामांना सुरुवात केली होती. जिल्ह्यात भात पिकाचे एक लाख २३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ८० हेक्टर शेतीवर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. नागली पिकाचे १० हजार क्षेत्र आहे.
अचानक पावसाने जुलै महिन्यात दडी मारली आहे. त्यामुळे केलेल्या पेरणीपैकी सुमारे २५ टक्के पेरणी करपून गेली आहे. बळीराजाने आभाळाकडे डोळे लावले आहेत. मात्र पावसाचा अद्याप पत्ता नसल्याने तो चांगलात धास्तावला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात केवळ ९.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ६ जुलै २०१४ रोजी हाच आकडा १०७.४० मिलीमीटर होता.
शेतात पाणी नसल्याने भात करपण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने कृपादृष्टी न केल्यास शेतामध्ये लावलेले सर्व भात पीक करपून जाण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार असल्याची भीती कृषी विभागाने वर्तविली आहे.
पावसाच्या दडीमुळे शेतातील पाणी आटले
कार्लेखिंड : यावर्षीचा पाऊस सुरुवातीला जोरदार पडल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची भातरोपे कुजली गेली आणि शेतकऱ्याला दुसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ आली. त्याच्यानंतर कशीबशी रोपे रुजली नाही तोच पावसाने अचानक दडी मारल्याने शेतामध्ये पाणी होते ते कडक उन्हामुळे झिरपून गेले आता शेत अक्षरश: कोरडे पडले आहे. त्यामुळे भात लावणीचा हंगाम लांबणीवर गेला आहे. जोपर्यंत जोरदार पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकरी शेतातील बेलवणी व इतर कामे आटोपण्याच्या मागे लागला आहे. पाऊस पडल्यानंतर लावणीचा हंगाम जोरात चालू होईल आणि कामासाठी माणसे सुद्धा वेळेवर मिळणार नाहीत. उलट मजुरीसाठी जास्त रुपये मोजण्याची पाळी येणार आहे. पाऊस नसल्यामुळे ट्रीलर यंत्रणेव्दारे नांगरणी करण्याची कामे बंद असल्याने त्यांचे सुद्धा नुकसान होत आहे.
लावणीच्या कामाला सुरु वात
च्मोहोपाडा : अचानक २१ जूननंतर पावसाने उसंत घेतल्याने शेतातील राब वाचविण्यासाठी बळीराजाने विविध प्रकाराने पाणीपुरवठा करून शेतातील राब वाचवून शेतात वरकी टाकून लावणी आवटणीच्या कामांना सुरुवात केली.त्यामुळे शेतकरी राजा सध्या शेतीच्या कामांत गुंतलेला दिसत आहे. शेतकऱ्यांनी खताचा मारा केल्यानंतर राब चांगल्या स्थितीत झाले असल्याने परिसरात शेतातील लावणीची कामे जोरात सुरू असून लावणी अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे.