Join us
Daily Top 2Weekly Top 5

रमजानमुळे खजुराच्या भावात झाली वाढ; इराकमधील ‘जाएदी’ला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 05:06 IST

रमजानचा रोजा सोडताना खजूर खाण्याची प्रथा असल्याने, रमजान महिन्यात खजुराच्या विक्रीत वाढ होते. यंदा रमजान सुरू होण्याच्या आठवडाभर पूर्वीपासूनच खजुराची मागणी वाढली असून, किमतीत १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.

- खलील गिरकरमुंबई : रमजानचा रोजा सोडताना खजूर खाण्याची प्रथा असल्याने, रमजान महिन्यात खजुराच्या विक्रीत वाढ होते. यंदा रमजान सुरू होण्याच्या आठवडाभर पूर्वीपासूनच खजुराची मागणी वाढली असून, किमतीत १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.किमिया या खजुराला मोठी मागणी असून, त्याचा दर ६०० ग्रॅमसाठी ११० रुपयांवरून १५० रुपयांवर गेला आहे. ७० रुपये किलो दराने मिळणाऱ्या साध्या खजुराची किंमत ९० रुपयांपेक्षा पुढे गेली आहे. मध्य पूर्वेच्या देशांमधून येणाºया खजुराला जास्त मागणी आहे. ट्युनिशिया येथील खजूर २०० रुपये, तर इराणमधील ब्लॅक लिली खजूर २४० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. सौदी अरेबिया येथील नावर जुमेरा खजुरासाठी किलोमागे २४० रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय इराकमधील जाएदी खजूरलाही चांगली मागणी आहे.प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी लावलेल्या अजवा खजुराचे महत्त्व सर्वात अधिक असल्याने, अजवा खजुराची किंमत सध्या अडीच ते ३ हजार रुपये किलो आहे. तीदेखील नेहमीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी वाढली आहे. या खजुराची विक्री जास्त होत नसली, तरी अनेक जण काही प्रमाणात या खजुराची खरेदी करण्याला प्राधान्य देतात. याशिवाय कलमी, ओमानी, मस्कती खजूर असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.रोजा सोडताना खजूर खाऊन सोडावा, अशी प्रथा असल्याने खजूर कितीही महाग असला, तरी खरेदी केला जातो. खजूर खाण्यामागे शास्त्रीय कारणदेखील आहे. दिवसभर खाण्यापिण्याशिवाय उपाशी राहिल्यानंतर रोजा सोडताना (इफ्तारी) शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी खजूर हा चांगला पर्याय आहे. खजुरामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते.दर किमान ९० ते तीन हजार रुपये किलोकिमान ९० रुपयांपासून ३ हजार रुपये किलो दरापर्यंतचे खजूर सध्या बाजारात उपलब्ध आहेत. सूर्यास्तानंतर रोजा सोडण्याच्या वेळी ज्या व्यक्ती घराबाहेर इफ्तारी करतात, त्यांच्यामधील अनेक जण त्यांच्या समूहाप्रमाणे १० ते ५० रुपयांचे खजूर खरेदी करतात, अशी माहिती मोहम्मद अली मार्ग येथे गेल्या ४५ वर्षांपासून वडिलोपार्जित खजूर विक्रीचा व्यवसाय करणाºया नजीर हुसेन यांनी दिली.

टॅग्स :मुंबई