राजीव गांधी आरोग्यदायी योजनेत दिरंगाई
By Admin | Updated: May 27, 2014 23:42 IST2014-05-27T23:42:43+5:302014-05-27T23:42:43+5:30
या योजनेंतर्गत होणार्या शस्त्रक्रि यांचा खर्च रूग्णालयांना विमा कंपनीमार्फत दिला जातो.

राजीव गांधी आरोग्यदायी योजनेत दिरंगाई
अलिबाग : अलिबागमधील शायलू आशाप्पा उसके या दगडखाणीवर काम करणार्या कामगाराची १८ वर्षीय मुलगी राधा उसके हिच्यावर राजीव गांधी आरोग्यदायी योजनेंतर्गत कामोठे, नवी मुंबई येथील एम.जी.एम. हॉस्पिटल येथे होणारी हृदयशस्त्रक्रिया तिच्या वडिलांचे रेशन कार्ड एप्रिल २०१३ नंतरचे असल्याने, शस्त्रक्रिया करण्यास राजीव गांधी योजना विभागाने असमर्थता दर्शविली आहे. राजीव गांधी आरोग्यदायी योजनेमधील अंमलबजावणीमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत काँग्रेसचेच माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी त्यांची नाराजी व्यक्त करणारे पत्र राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी व रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांना पाठविले आहे. या योजनेंतर्गत होणार्या शस्त्रक्रि यांचा खर्च रूग्णालयांना विमा कंपनीमार्फत दिला जातो. शासनाने एप्रिल २०१३ नंतरच्या रेशनकार्ड धारकांच्या विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे भरला नसल्याने रूग्णालये अशा शस्त्रक्रिया करण्यास तयार नसतात अशी माहिती एम. जी. एम. हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. मधुकर ठाकूर यांनी ही बाब राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी व रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांना पत्र लिहून कळवली आहे. शासनाने गोरगरिबांच्या आरोग्यासाठी केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना अशा तांत्रिक बाबींमुळे अडचणीत येणे योग्य नाही असे नमूद करून राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत एप्रिल २०१३ नंतर रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळत नसल्याने ही अट रद्द करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेणे तसेच मानवतावादी दृष्टिकोनातून राधा शायलू उसके या गरीब मजुराच्या मुलीवरील हृदयशस्त्रक्रियेसाठी एम.जी.एम. हॉस्पिटल, कामोठे, नवी मुंबई यांना आदेश देण्याची विनंती ठाकूर यांनी या पत्रात केली आहे.