Join us  

रास्ता-रेलरोकोमुळे मुंबई वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 7:06 AM

कोरेगाव-भीमा प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर मुंबईत मंगळवारी सायंकाळपासूनच तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली.

मुंबई - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर मुंबईत मंगळवारी सायंकाळपासूनच तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. मात्र जाळपोळ, तोडफोडीमुळे बुधवारी या आंदोलनाने महाराष्ट्र बंदने अधिक तीव्र रूप धारण केले. या बंदाच्या पार्श्वभूमिवर मुंबई शहरासह उपनगरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या रास्ता आणि रेल रोकोमुळे मुंबईकरांना वेठीस धरले होते.मुंबई शहरासह उपनगरात मंगळवारपासूनच मोठ्या संख्येने इमारतींबाहेर निषेधाचे फलक झळकत होते. मात्र धावत्या मुंबईला महाराष्ट्र बंदमधील हिंसक आंदोलनामुळे बुधवारी ब्रेक लागल्याचे दिसले. वारंवार होणारे रेल रोको, पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गावरील रास्ता रोकोंमुळे मुंबईकरांचे पुरते हाल झाले. संतापजनक बाब म्हणजे आंदोलनाआडून काही हुल्लडबाजांनी पार्किंगमध्ये असलेल्या खासगी आणि सार्वजनिक वाहनांची तोडफोड केली. तर काही समाजकंटकांनी रस्त्यावर दुचाकी जाळून आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही सर्व परिस्थिती मुंबई पोलिसांनी मोठ्या संयमाने हाताळली. परिणामी, आंदोलनाने अधिक पेट घेण्याऐवजी सायंकाळपर्यंत जनजीवन सुरळीत झाल्याचे दिसले.या आंदोलनाने देशाच्या आर्थिक राजधानीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने गोरेगावच्या मनोरंजन नगरीतील चित्रीकरण ठप्प होते. तर येथील सर्वच चित्रपटगृहांतील शो आणि नाटकांचे शो आज जवळपास झालेच नाहीत. त्यामुळे मनोरंजन नगरीचा दिवसभराचा गल्ला बुडाला. बाजारपेठाही ठप्प पडल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल आज झाली नसल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले.पूर्व उपनगर बनले आंदोलनाचे केंद्र१मुलुंड टोलनाका बंद पाडत जमावाने चेकनाका परिसरात निदर्शने केली. सकाळी ८ वाजल्यापासूनच येथून जाणाºया बेस्टच्या बसेसमधील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले आणि बसेसच्या टायरमधील हवा काढण्यात आली. पूर्व उपनगरात सकाळपासूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलुंड, भांडुप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर परिसरात भीमसैनिकांनी मोर्चे काढले. या परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. मुलुंड पोलिसांनी फ्लॅग मार्च काढत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले.२विक्रोळी गोदरेज गेटपासून गांधीनगर जंक्शन परिसरात २००हून अधिक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. तर भांडुप मेट्रो मॉलपासून पवईच्या दिशेने उभ्या असलेल्या खासगी बसेससह बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली. मुलुंड, भांडुप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर परिसरात रेल रोकोचा प्रयत्न करण्यात आला. कांजूर रेल्वे स्थानकातील आसन खुर्च्या रेल्वे रुळावर फेकण्यात आल्या होत्या. सायन कोळीवाडा, धारावी परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोड करत काही ठिकाणी जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. पूर्व द्रुतगती मार्ग पाच तासांहून अधिक वेळ खोळंबला होता. सायंकाळी ५च्या सुमारास येथील वाहतूक सेवा सुरळीत झाली.ंसुरक्षेचा उपाय म्हणून ‘दुकाने बंद’कांदिवली, बोरीवली, मालाड, गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक आंदोलनकर्त्यांनी चार ते पाच तासांसाठी रोखून धरली. अनेक ठिकाणी सुरू असलेली दुकाने बळजबरीने बंद करण्यात आली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कोणालाच जुमानत नसल्याने अन्य दुकानदारांनी स्वत:च खबरदारीचा उपाय म्हणून दुकाने बंद केली.मॉलचेही ‘शटर डाऊन’खेरवाडी, वांद्रे, कला नगर, हिल रोड, वाकोला परिसरातही अकरा ते साडे अकराच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी येतील मॉलचे शटर बंद करण्यास भाग पाडले. अंधेरीच्या मेट्रो परिसरातही याच वेळी दुकाने बंद करण्यात आली. तर अंधेरी पश्चिम परिसरातील इन्फिनिटी मॉलचेही शटर डाऊन करण्याची ताकीद देण्यात आली.माटुंग्यात निषेधमाटुंग्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात झाली. धारावी पोलीस स्टेशनपासून हा मोर्चा टी-जंक्शन मार्गावर येताच आंदोलकांनी रास्ता रोको केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आंदोलनामुळे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी आंदोलकांना समजावत बाजूला काढले.बेस्ट बसचा मुक्काम मुंबई सेंट्रल आगारातमुंबई सेंट्रल येथील बेस्ट बस डेपोमध्ये दुपारनंतर जवळपासच्या मार्गावरील बसेस वळविण्यात आल्या होत्या. या बसेस त्या ठिकाणी बंद करून संपूर्ण आगारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसून आला. तसेच मुंबई सेंट्रल एसटी आगारातही काहीसे असेच चित्र दिसून आले. एरव्ही बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी या ठिकाणी असते, मात्र बंदमुळे एसटी आगारात केवळ एकामागोमाग एसटी उभ्या होत्या.गिरगावात संमिश्र प्रतिसादमरिन लाइन्स, गिरगाव, गॅ्रण्ट रोड परिसरात बंदचा परिणाम काही प्रमाणात दिसून आला. या ठिकाणी रस्त्यांवर पोलीस व्हॅन फिरत होत्या आणि ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. पण, या परिसरात कुठेही फार काळ तणाव नव्हता.काळबादेवी, लॅमिंग्टन रोड, आॅपेरा हाउस या ठिकाणी शांततेचे वातावरण दिसून आले. मुंबई सेंट्रल परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला. या ठिकाणी काही स्थानिक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती, मात्र येथील हॉटेल्स सुरू असल्याचे दिसून आले.धारावीत १०० टक्के बंदमहाराष्ट्र बंदला धारावी-माटुंगा लेबर कॅम्प परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. या ठिकाणची दुकाने, स्टॉल बंद ठेवून हल्ल्याच्या निषेधाचे बोर्ड लावण्यात आले होते. आंदोलकांनी मनुवादी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर कडक कारवाईची मागणी करीत त्यांच्या प्रतिकृती जाळून निषेध करण्यात आला. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.फोर्ट, चर्चगेट सुरळीतफोर्ट आणि चर्चगेट परिसरातील दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. मात्र कार्यालयीन कर्मचाºयांचा ओघ कमी असल्याने रस्ते रिकामे दिसत होते. आझाद मैदानाजवळील विक्रेत्यांना विचारले असता बंदमुळे कमी लोकांनी हजेरी लावल्याचे सांगितले....अन् चाकरमानी अडकलेबुधवारी सकाळी ठाणे, कल्याण, वाशी, कर्जत, दहिसर, भार्इंदर अशा ठिकाणांहून लवकर आपले कार्यालय गाठणाºया चाकरमान्यांना दुपारनंतर शहर-उपनगरातील वातावरण बिघडल्याची वार्ता कळाली. अशा वेळी घर गाठण्यासाठी चाकरमान्यांनी धडपड केली, मात्र दुसºया बाजूला रेल रोको, रास्ता रोका, बेस्ट बसेस रद्द झाल्यामुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल बंद झाल्याने कार्यालयातून निघालेल्या चाकरमान्यांची ‘त्रिशंकू’ अवस्था झाली.डबेवाल्यांची सेवा बंदबंदच्या घोषणेमुळे वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेता मुंबईच्या डबेवाल्यांनी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. जेवणाचे डबे वेळेवर पोहोचले नाहीत. पण ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून डबेवाल्यांनी बुधवारी सकाळीच ग्राहकांशी संपर्क साधून सेवा बंद असल्याचे सांगत चाकरमान्यांनी डबा स्वत:च घेऊन जाण्याची विनंती केली.

टॅग्स :महाराष्ट्र बंदभीमा-कोरेगाव