प्रदूषणावरून दोन कारखान्यांत वाद
By Admin | Updated: June 13, 2014 00:47 IST2014-06-13T00:47:10+5:302014-06-13T00:47:10+5:30
महाड औद्योगिक वसाहतीतील मल्लक स्पेशालिटी आणि वसुंधरा केमिकल या दोन कारखान्यांमध्ये पाणी आणि वायू प्रदूषणावरून वाद सुरू आहे.

प्रदूषणावरून दोन कारखान्यांत वाद
महाड : महाड औद्योगिक वसाहतीतील मल्लक स्पेशालिटी आणि वसुंधरा केमिकल या दोन कारखान्यांमध्ये पाणी आणि वायू प्रदूषणावरून वाद सुरू आहे. याबाबत मल्लक स्पेशालिटी हा कारखाना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे गेला असून प्रदूषित पाणी उचलण्याच्या सूचना मल्लक कारखान्याला तर पाणी आणि वायू प्रदूषणाबाबत वसुंधरा केमिकल या कारखान्याला नोटीस बजावण्यात आली आहे. या परिसरातील नाल्याचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना औद्योगिक वसाहत प्रशासनाला करण्यात आल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली आहे.
महाड औद्योगिक वसाहतीतील १०३ या प्लॉटमध्ये मल्लक स्पेशालिटी ही तर शेजारील १०४ या प्लॉटमध्ये वसुंधरा केमिकल हा कारखाना आहे. या दोन कारखान्यामध्ये सामाईक संरक्षक भिंत आहे. गेल्या वर्षभरापासून या दोन कारखान्यामध्ये पाणी आणि वायू प्रदूषण या कारणावरून वाद सुरू आहे. मल्लक स्पेशालिटी आणि वसुंधरा केमी. यांच्या सामाईक संरक्षक भितीतून अॅसिटीक पाणी झिरपत आहे. या कारणावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने मल्लक स्पेशालिटीवर प्रदूषणाचा ठपका ठेवला आहे. हे प्रदूषण आपले नाही तर शेजारील वसुंधरा केमिकल कारखान्याचे आहे असे मल्लक स्पेशालिटीचे म्हणणे होते. मागील वर्षी याच कारणावरून या दोन कारखान्यांमध्ये वाद झाला होता. बुधवारी मल्लक स्पेशालिटीने सकाळी प्रथम सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील अधिकारी बोरूले यांनी या प्रदूषण प्रकरणी बोलावून घेतले. हे प्रकरण आपल्याकडे येत नसून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जाण्याचा सल्ला बोरूले यांनी दिला. त्यानुसार मल्लक स्पेशालिटीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली.
या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कक्ष अधिकारी पवार यांनी दोन्ही कारखान्यांची पाहणी केली. यामध्ये मल्लक कारखान्याच्या भिंतीतून अॅसिटीक पाणी झिरपत आल्याचे आणि पांढऱ्या रंगाची रासायनिक धूळ (अॅसिटिक फ्युम) परिसरात उडत असल्याचे समोर आले. सदरची रासायनिक धूळ वसुंधरा केमिकल या कारखान्याची असल्याचेही निदर्शनास आले. सदर प्रकरणानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाल्यातील अॅसिट पाणी उचलण्याचे आदेश मल्लक स्पेशालिटी या कारखान्याला दिले. तर वसुंधरा केमिकल कारखान्याला वायू प्रदूषणाबाबत नोटीस दिली आहे. (वार्ताहर)