पोलीस वसाहतींना दुरूस्तीअभावी घरघर
By Admin | Updated: March 9, 2015 01:11 IST2015-03-09T01:11:50+5:302015-03-09T01:11:50+5:30
सद्रक्षणाय खल निग्रहणाय या ब्रीद वाक्याप्रमाणे जनतेचे रक्षण करणा-या नवी मुंबई पोलिसांच्या वसाहतींना देखभाल दुरूस्तीअभावी घरघर लागली आहे.

पोलीस वसाहतींना दुरूस्तीअभावी घरघर
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
सद्रक्षणाय खल निग्रहणाय या ब्रीद वाक्याप्रमाणे जनतेचे रक्षण करणा-या नवी मुंबई पोलिसांच्या वसाहतींना देखभाल दुरूस्तीअभावी घरघर लागली आहे. ८५४ घरांपैकी २४० घरे रिक्त असून उर्वरित घरांमध्ये पोलिसांच्या कुटुंबीयांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या पोलिसांसाठी रबाळे एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी, वाशी, सीबीडी, पनवेल आणि उरण येथे पोलीस वसाहती आहेत. त्यापैकी वाशी आणि सीबीडी येथील सिडकोने बांधलेली घरे नागरिकांच्या प्रतिसादाअभावी पोलिसांच्या पदरी पडली. त्यानुसार परिमंडळ १ मध्ये ४६२ तर परिमंडळ २ मध्ये ३९२ अशी एकूण ८५४ घरे पोलिसांसाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी सिडकोनिर्मित घरांची गेल्या तीस वर्षांत डागडुजी झालेली नसल्याने अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे या घरांच्या डागडुजी अथवा पुनर्बांधणीसाठी पोलीस प्रशासनाने सातत्याने पाठपुरावाही केला. मात्र सिडको व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे पोलीस वसाहतीच्या दुरवस्थेत अद्याप सुधारणा झालेली नाही. डागडुजीसाठी निधी नसल्याचे कारण बांधकाम विभागाकडून पुढे केले जात असल्याचे समजते. मात्र पोलिसांच्या वेतनातून घराच्या देखभालीचा खर्च वजा होत असतानाही सुविधेसाठी त्याचा वापर मात्र होत नसल्याचा संताप कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मंत्रिमंडळातील बदलानंतर नव्या मंत्र्यांच्या सोयीनुसार निवासस्थानांवर मर्जीनुसार कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो. मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षित घरासाठी देखील निधी उपलब्ध होत नसल्याची खंत पोलिसांनी व्यक्त केली आहे. इमारतींच्या भिंतींना तडे गेलेले असून, अनेक घरांच्या खिडक्याही तुटलेल्या आहेत.