Join us  

हिमालय पुलाच्या पाहणीकडे देसाईसह पालिकेचेही दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 2:32 AM

सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या सुरू असलेल्या तपासणीदरम्यान स्ट्रक्चरल आॅडिटर नीरज कुमार देसाई तसेच पालिका अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पाहणी करण्याबाबत सांगितले होते.

मुंबई : सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या सुरू असलेल्या तपासणीदरम्यान स्ट्रक्चरल आॅडिटर नीरज कुमार देसाई तसेच पालिका अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पाहणी करण्याबाबत सांगितले होते. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. दोघांपैकी कोणीही काम पाहण्यासाठी आले नसल्याचा खुलासा गुजरातच्या जिओ डायनामिक्स कंपनी प्रमुख रवीकिरण रमेश वैद्यच्या जबाबातून झाला आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करीत आहेत. तसेच गुरुवारी देसाईला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.प्रोफेसर डी. डी. देसाई असोसिएट इंजिनीअरिंग कन्सल्टंट अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिस्ट कंपनीच्या नीरज कुमार देसाईला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पालिकेने त्याच्याकडे मुंबईतील ३९ महत्त्वाच्या पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडिटची जबाबदारी दिली होती. सप्टेंबर २०१६ मध्ये त्याला याबाबतचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. त्यानंतर उड्डाणपूल, स्कायवॉक, भुयारी मार्ग, रेल्वे मार्गावरील पूल अशा स्वरूपाच्या सर्व प्रकारच्या एकूण ७६ पुलांचे त्याने आॅडिटिंग केले. या पुलांसाठी त्याने वडोदराच्या जिओ डायनामिक्स कंपनीला सब कॉन्ट्रॅक्ट दिले होते.वैद्य यांच्या जबाबानुसार, देसाईच्या सांगण्यानुसार, पुलासंबंधित महत्त्वाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्या करतेवेळी देसाई तसेच पालिका अभियंत्यांनी उपस्थित राहावे असे वारंवार सांगण्यात आले होते. मात्र कोणीही आले नाही. त्यानुसार, काम पूर्ण करून संबंधित अहवाल सादर करण्यात आल्याचेही त्यांनी जबाबात म्हटले आहे.वीरटग एंटरप्रायझेज या कंपनीचे गुमानसिंग राठोड यांचाही जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यांनी या पुलाच्या किरकोळ डागडुजीसह रंगरंगोटी केली होती. त्यादरम्यान पालिका उपअभियंत्यांनी पाहणी केली होती. या कामासाठी त्यांना ३१ लाख रुपये देण्यात आले होते. पालिकेच्या ‘ए’ वॉर्डकडून या कामाची निविदा काढण्यात आली होती.दरम्यान, आतापर्यंत पूल विभागाचे मुख्य अभियंता संजय दराडे यांच्यासह पाच ते सहा पालिका अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. या काळात दोन पालिका अधिकारी निवृत्त झाले. त्यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली आहे.देसाईची रवानगी न्यायालयीन कोठडीतनीरज कुमार देसाईकडील कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली असून, तज्ज्ञांची मदत घेत त्या कागदपत्रांचा तपास सुरू आहे. तसेच न्यायालयाने त्याला १० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य संशयितांकडेही चौकशी सुरू आहे. त्यामुळे लवकरच आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यताही पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी वर्तविली आहे. यासंदर्भात महिनाभरात पालिकेच्या मुख्य दक्षता विभागाचाही अहवाल येणार आहे. त्या अहवालानुसारही पोलीस तपास करणार आहेत.

टॅग्स :सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनामुंबई महानगरपालिका