वनविभागाच्या अकार्यक्षमतेमुळे शौचालये वापराविना उभी
By Admin | Updated: February 24, 2015 22:10 IST2015-02-24T22:10:37+5:302015-02-24T22:10:37+5:30
संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे वनविभागाने पर्यटकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी २५ लाख रुपये खर्चून आधुनिक पद्धतीची

वनविभागाच्या अकार्यक्षमतेमुळे शौचालये वापराविना उभी
माथेरान : संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे वनविभागाने पर्यटकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी २५ लाख रुपये खर्चून आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे खरेदी केली. एकूण १६ स्वच्छतागृहे आणून ती पर्यटकांची वर्दळ असलेल्या महत्त्वाच्या चार ठिकाणी बसविण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात ही योजना पूर्ण झालीच नाही, शिवाय ज्या ठिकाणी स्वच्छतागृहे ठेवली आहेत ती पर्यटकांच्या वापराविना उभीच आहेत.
स्वच्छतागृहांसाठी नगरपरिषद नळजोडणी देणार होती. स्वच्छतागृह उभारताना त्यावर सिमेंट काँक्रीटचा पाया बांधून त्यावर ती ठेवली जाणार होती. हे सर्व बांधकाम ठेकेदार कंपनीचे होते. त्यानंतर ही स्वच्छतागृहे वनविभाग ताब्यात घेणार होते. या १६ स्वच्छतागृहांपैकी १२ स्वच्छतागृहे पर्यटकांच्या वापरात नाहीत. महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी दोन अशी चार स्वच्छतागृहे नियोजित ठिकाणी ठेवण्याची योजना होती, परंतु ती प्रत्यक्षात आलीच नाही. पिसारनाथ मंदिर, शार्लोट लेक परिसरात माथेरान संयुक्त वनविभाग व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने चार स्वच्छतागृहे बसविण्यात आल्यामुळे ती सध्यातरी सुस्थितीत आहेत.
पर्यटकांची वर्दळ असलेला एक्को पॉइंट, माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका तसेच फॉरेस्ट गार्डनमध्ये बसविण्यात आलेली नाहीत. इतर ठिकाणी बसविलेली स्वच्छतागृहे सध्या धूळ खात असून पर्यटकांना याचा काहीच फायदा होत नसल्याने येथील स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमधून संताप व्यक्त होत आहे.