बेकायदा उत्खननामुळे कोसबी गावाला धोका

By Admin | Updated: August 10, 2014 23:15 IST2014-08-10T22:49:48+5:302014-08-10T23:15:45+5:30

कोसबी गावालगतच्या डोंगरमाथ्यावर गेल्या दीड वर्षापासून एका खाजगी विकासकाने केलेल्या बेकायदा माती उत्खननामुळे कोसबी गावासह रावढळ गावांना दरडी कोसळण्याचा मोठा धोका

Due to illegal excavation, Kosabi village risk | बेकायदा उत्खननामुळे कोसबी गावाला धोका

बेकायदा उत्खननामुळे कोसबी गावाला धोका

संदीप जाधव, महाड
कोसबी गावालगतच्या डोंगरमाथ्यावर गेल्या दीड वर्षापासून एका खाजगी विकासकाने केलेल्या बेकायदा माती उत्खननामुळे कोसबी गावासह रावढळ गावांना दरडी कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करुनही महसूल विभागाने त्यावर कुठलीही कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ येत्या स्वातंत्र्य दिनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा गोढे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिल जाधव यांनी दिला आहे.
रावढळ, कोसबी या गावालगत असलेल्या या डोंगराशेजारुनच कोकण रेल्वेचा मार्ग असून या रेल्वेमार्गालाही दरडीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या दरडीमुळे माळीण दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती घडण्याची भीती देखील येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. दासगाव जुई, कोडीवते, रोहन या ठिकाणी २००५ च्या अतिवृष्टीत दरडी कोसळून १०० हून अधिक ग्रामस्थ गाडले गेले होते. तर अनेक कुटुंबे बेघर झाली होती. या घटनांच्या आठवणी अद्यापही येथील ग्रामस्थांमध्ये ताज्याच असून या संभाव्य धोक्यामुळेही या परिसरातील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली राहत आहेत. या डोंगराच्या लगत महाड म्हाप्रळ मार्गाला लागून असलेल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत असून या ठिकाणी ८०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या डोंगराच्या दरडीचा या इमारतीलाही मोठा धोका असून दरडी कोसळल्यास मोठ्याप्रमाणावर जीवित हानी होण्याची भीती पालकांमध्ये व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to illegal excavation, Kosabi village risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.