Join us  

मुसळधार पावसामुळे 'या' एक्सप्रेस झाल्या रद्द; मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 9:18 AM

सुरक्षेच्या कारणास्तव मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आल्याचं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

मुंबई - शहर आणि उपनगरात पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. शुक्रवारी रात्रीपासून मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईकरांना अनेक अडचणींचा तोंड द्यावं लागत आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

मध्य रेल्वेच्या सायन-कुर्ला दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकातही पावसामुळे पाणी साचलं आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरु आहे. पनवेल ते सीएसएमटी सेवाही विस्कळीत झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आल्याचं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

पावसामुळे एक्सप्रेस सेवा रद्द

  • मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस 
  • मुंबई- मनमाड राज्यराणी एक्सप्रेस
  • मनमाड-एलटीटी एक्सप्रेस
  • मुंबई-शिर्डी साईनगर एक्सप्रेस
  • पुणे-मुंबई  सिंहगड एक्सप्रेस
  • पुणे-मुंबई डेक्कन क्वीन 
  • मुंबई - सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस
  • मुंबई- चेन्नई मेल
  • मुंबई - भूसावळ पॅसेंजर 
  • मुंबई- कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
  • भूसावळ-पुणे एक्सप्रेस

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवरील एक्सप्रेस सेवांवर परिणाम झाला आहे. मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गाड्या वळविण्यात आल्या आहेत.   तसेच पश्चिम रेल्वेवरही वसई-विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटे उशिराने सुरु आहे. तर वांद्रे-वापी पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. 

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटपाऊस