जुगारावरील कारवाईमुळेच चर्चवर दगडफेक

By Admin | Updated: March 25, 2015 02:11 IST2015-03-25T02:11:33+5:302015-03-25T02:11:33+5:30

खांदेश्वर येथील चर्चवर शुक्रवारी दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी चर्चच्या समोरील पुलाखाली जुगार चालवणाऱ्या तरुणांना अटक केली आहे.

Due to gambling action, church picketing | जुगारावरील कारवाईमुळेच चर्चवर दगडफेक

जुगारावरील कारवाईमुळेच चर्चवर दगडफेक

नवी मुंबई : खांदेश्वर येथील चर्चवर शुक्रवारी दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी चर्चच्या समोरील पुलाखाली जुगार चालवणाऱ्या तरुणांना अटक केली आहे. राहुल पाटील (३९), लक्ष्मण सुगवेकर (२१), मोहमद शेख (२०) व अनिल चौहान अशी त्यांची नावे आहेत.
राहुल हा चर्चलगतच्याच पुलाखाली काळा-पिवळा जुगार चालवायचा. लक्ष्मण, मोहमद व अनिल यांच्यामार्फत हा जुगार चालवला जायचा. याकरिता त्यांना प्रतिदिन २०० रुपये द्यायचा. चर्चलगत चालणारा हा जुगार थांबवण्यासाठी चर्चमधीलच एका व्यक्तीने त्यांना समज दिली होती. त्यानंतरही जुगार सुरूच असताना एक निनावी तक्रार खांदेश्वर पोलिसांकडे आली. त्यानुसार पोलिसांनी या जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई केली. ही कारवाई चर्चमधील व्यक्तींच्याच सांगण्यावरून पोलिसांनी केल्याचा संशय राहुल पाटील याला होता. त्यामुळे मेहुणा लक्ष्मण सुगवेकर याला सांगून मोहमद व अनिल यांच्या मदतीने त्याने चर्चवर दगडफेक केली. त्यानुसार राहुलच्याच मोटारसायकलवरून (एमएच ४३ एस ६८२२) येऊन तिघांनी चर्चबाहेरील पुतळ्यावर दगडफेक केल्याची कबुलीही दिल्याचे अपर आयुक्त फत्तेसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी उपआयुक्त संजयसिंह येनपुरे, साहाय्यक आयुक्त रणजीत धुरे, वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे आदी उपस्थित होते.
पहिल्या दोन प्रयत्नांत काच न फुटल्याने तिसऱ्यांदा मारलेल्या दगडाने काच फुटल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यांनी खिशातून दगड आणले होते. (प्रतिनिधी)

हेअर स्टाईलमुळे सापडले जाळ्यात : चर्चवर दगडफेक करण्यासाठी येताना दोघांनी तोंडाला रूमाल बांधले होते. एकाचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये अस्पष्ट दिसत होता. याचवेळी गुन्हे शाखा सीसीटीव्ही फूटेजचे विश्लेषण करत असताना मोहमद याच्या स्पाईक्स हेअरस्टाईलमुळे तपासाचा मार्ग मोकळा झाला. अशा हेअरस्टाईलच्या व्यक्तीचा शोध घेत असताना खांदेश्वर परिसरातूनच मोहमद याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देताच मंगळवारी इतर सर्वांना अटक करण्यात आली.

Web Title: Due to gambling action, church picketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.