Join us  

अग्निसंकटाच्या धगीमुळे मुंबईकरांची घुसमट कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 1:52 AM

दुर्घटनांत सातत्याने वाढ : ५३ हजार ३३३ दुर्घटनांत ६६६ जणांचा मृत्यू

मुंबई : कुलाब्यातील चर्चिल चेंबरच्या आगीत रविवारी एकाचा झालेला मृत्यू आणि १४ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला लागलेल्या आगीतून तब्बल ८४ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही दुर्घटनांमध्ये नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलास यश आले असले तरी आगीच्या दुर्घटनांत सातत्याने वाढ होत असून, २००८ ते २०१८ या कालावधीत ५३ हजार ३३३ आगीच्या दुर्घटनांत ६६६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना माहिती अधिकारान्वये प्राप्त कागदपत्रातून ही माहिती समोर आली असून, ६६६ मृतांमध्ये ४०४ पुरुष, २२३ महिला, ३४ मुले आणि ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याने तसेच मुंबईकरांमध्ये जागरूकता कमी असल्याच्या कारणांसह आगीचा वाढता धोका कायम आहे. मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत दिवसाला सरासरी ११ आगीच्या दुर्घटना घडत असून, यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होत आहे. मुंबई अग्निशमन दलाने मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अनेक उपक्रम हाती घेतले असून, त्या अंतर्गत मुंबईकरांना प्रशिक्षण देण्याचे काम केले जात आहे. या अंतर्गत आगीपासून बचाव कसा करायचा, याची माहिती मुंबईकरांना दिली जात आहे.

खासगी स्तरासह सार्वजनिक स्तरावर आगीबाबत जनजागृती केली जात असून, मुंबईला सुरक्षित ठेवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१५ साली ५ हजार २१२ आगीच्या दुर्घटना घडल्या. या वर्षी एका दिवसात घडत असलेल्या आगीच्या घटनांचा सरासरी आकडा १४ होता. २०१६ साली ५ हजार २१ आगीच्या घटना घडल्या. त्या वर्षी दिवसाला सरासरी १४ आगीच्या घटना घडल्या होत्या. २०१७ साली ४ हजार ९२७ आगीच्या घटना घडल्या. दिवसाला आगी लागण्याचे हे प्रमाण सरासरी १३ होते. २०१८ साली ३ हजार ९८७ आगीच्या दुर्घटना घडल्या. या वर्षी दिवसाला सरासरी आगीच्या ११ घटना घडत होत्या, असे पालिकेने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.

आतापर्यंतच्या दुर्घटनांवर दृष्टिक्षेप

  • चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) मधल्या रिफायनरी हायड्रोजन क्रॅकर प्लांटमध्ये स्फोट होऊन लागलेल्या आगीत ४५ जण जखमी होण्याची घटना घडली होती.
  • परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला होता. या आगीदरम्यान रहिवाशांचे प्राण वाचविण्यासाठी झेन सदावर्ते या मुलीने पुढाकार घेत अनेकांचे प्राण वाचविले.
  • कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला होता.
  • विलेपार्ले येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला आग लागली. आगीत २४ जण जखमी झाले. त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला.
  • साकीनाका येथील खैरानी रोडवरील भानू फरसाणच्या दुकानाला लागलेल्या आगीत तब्बल १२ कामगारांना आपला जीव गमवावा लागला.
  • अंधेरीतील कामगार रुग्णालयात आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेत गुदमरून १० जणांचा मृत्यू झाला.
  • कांदिवली येथील दामूनगरमधील कपड्याच्या कारखान्याला आग लागली. या आगीत चौघांचा मृत्यू झाला.
  • चेंबूर येथील सरगम सोसायटीला लागलेल्या आगीत पाच ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला.
  • वडाळा पूर्वेकडील बरकत अली नाका येथील २१ मजली श्री गणेश साई इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील आगीत १५ जण गुदमरले.
  • वांद्रे पश्चिमेकडील लालमाती परिसरातील नर्गिस दत्त झोपडपट्टीला लागलेल्या आगीत सुमारे साठ ते सत्तर झोपड्या जळून खाक झाल्या.
  • दिवाळीच्या पाच दिवसांत मुंबईत तब्बल १९६ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. यापैकी ५० ठिकाणी फटाक्यांमुळे आगीचा भडका उडाला.
  • ऑक्टोबर २०१७ ते एप्रिल २०१८ मधील आगीच्या घटनांमध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला.
टॅग्स :मुंबईआग