ई-टेंडरिंग प्रक्रियेमुळे कलिनातील विकासकामे खोळंबली
By Admin | Updated: November 16, 2015 02:32 IST2015-11-16T02:32:56+5:302015-11-16T02:32:56+5:30
आरोग्य, झोपडपट्टी, पाणी, अनधिकृत बांधकामांनी वेढलेले फुटपाथ, विमानतळालगतच्या झोपड्या, कचराकुंड्या, नाले आणि शौचालये; अशा मोठ्या प्रश्नांवर कलिना विधानसभेचे

ई-टेंडरिंग प्रक्रियेमुळे कलिनातील विकासकामे खोळंबली
सचिन लुंगसे, मुंबई
आरोग्य, झोपडपट्टी, पाणी, अनधिकृत बांधकामांनी वेढलेले फुटपाथ, विमानतळालगतच्या झोपड्या, कचराकुंड्या, नाले आणि शौचालये; अशा मोठ्या प्रश्नांवर कलिना विधानसभेचे आमदार संजय पोतनीस कार्यरत आहेत. राज्य सरकारला वर्ष पूर्ण झाले. तथापि, पोतनीस यांना केवळ शौचालये, नाले आणि काहीशा रस्त्यांचीच कामे करता आली. यामागील मुख्य कारण म्हणजे ई-टेंडरिंगमुळे विकासनिधी मिळण्यास होणारा विलंब. विकासनिधी मिळण्यास विलंब होत असल्याने कामे मार्गी लागत नसल्याचे पोतनीस स्वत: मान्य करतात. पण हेच सांगताना पुढील काळात कोणती कामे मार्गी लागणार आहेत हे ते आवर्जून नमूद करतात.
कलिना विधानसभा मतदारसंघ तसा बहुभाषिक. राज्यातल्या महायुती सरकारची वर्षपूर्ती झाल्याने पोतनीस यांच्याही वर्षभरातल्या कारकिर्दीचा आढावा ‘लोकमत’ने घेतला. मुळात पोतनीस यापूर्वी नगरसेवक राहिल्याने स्थानिक कामांची त्यांना चांगलीच जाण आहे. आता ते आमदार झाल्यानंतर लोकांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच पोतनीस सध्या स्थानिक कामांसह मोठ्या कामांना प्राधान्य देत आहेत.
पोतनीस यांनी कामांची सुरुवात स्थानिक स्तरावरूनच केली आहे. गणेशोत्सवासह नवरात्रौत्सवापूर्वी कुर्ला पश्चिमेकडील शीतल तलावातील गाळ काढण्याचे काम त्यांनी केले. शौचालयासंदर्भात आलेल्या तक्रारींचीही त्यांनी दखल घेतली. ज्या शौचालयांची कामे लवकर करणे शक्य होते तेदेखील केले. रस्ते आणि गटारांच्या कामांबाबतदेखील त्यांची अशीच त्वरेने कार्यवाही केली. रस्त्यांच्या कामांना विलंब होत असला तरी दुर्गंधी उद्भवू नये आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून त्यांनी गटरांच्या साफसफाईच्या कामांना प्राधान्य दिले.
आता कुर्ला न्यू मिल रोडवरील स्विमिंग पूलसाठी ते प्रयत्नशील आहेत. शीतल तलावाच्या सुशोभीकरणाचाही मुद्दा आहे. महत्त्वाचे म्हणजे विमानतळालगतच्या झोपड्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी ते सध्या गुंतलेले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळलेला आहे. तो त्यांच्या अजेंड्यावर आहे. कुर्लाचे भाभा रुग्णालय हे त्यांच्या मतदारसंघात नाही. तरीही त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
मुंबई-ठाण्याला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कल्पना सिनेमा येथे फुटपाथवर अनधिकृत बांधकामे आहेत. हे फुटपाथ मोकळे झाल्यास पादचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण. तथापि, येथील बेकायदेशीर गाळेधारकांचा नागरिकांना नाहक त्रास होतो. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.