दूषित पाण्यामुळेदोन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
By Admin | Updated: November 12, 2015 02:56 IST2015-11-12T02:56:18+5:302015-11-12T02:56:18+5:30
मालाडच्या कुरार परिसरात बुधवारी एका दोन वर्षीय चिमुरड्याचा दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू झाला. स्थानिक विकासकाने बसविलेली कमकुवत जलवाहिनी

दूषित पाण्यामुळेदोन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
मुंबई : मालाडच्या कुरार परिसरात बुधवारी एका दोन वर्षीय चिमुरड्याचा दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू झाला. स्थानिक विकासकाने बसविलेली कमकुवत जलवाहिनी फुटून त्यात दूषित पाणी मिसळत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
कुरारमध्ये ओमकार इमारतीमध्ये राहणाऱ्या वेदांत जेठवा याला दोन दिवसांपूर्वी जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे बुधवारी उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दूषित पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले. परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांना अशाच प्रकारचा त्रास झाला आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती कुरार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. २८ आॅक्टोबरला संबंधित बिल्डरने ही जलवाहिनी बसविली होती. ही जलवाहिनी तुटल्याने त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा झाला. या प्रकरणी पालिकेला तक्रार केल्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी पालिकेने जलवाहिनीची दुरुस्ती केली. मात्र ती पुन्हा तुटल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)