गोरेगावात पालिकेचे सिद्धार्थ रुग्णालय बंद, दुरुस्तीचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 02:16 IST2019-05-28T02:16:25+5:302019-05-28T02:16:30+5:30
नागरिकांना कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देताच गोरेगावचे सिद्धार्थ रुग्णालय दुरुस्तीच्या नावाखाली अचानक बंद करण्याचा पालिका प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

गोरेगावात पालिकेचे सिद्धार्थ रुग्णालय बंद, दुरुस्तीचे कारण
मुंबई : नागरिकांना कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देताच गोरेगावचे सिद्धार्थ रुग्णालय दुरुस्तीच्या नावाखाली अचानक बंद करण्याचा पालिका प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मनसैनिकांनी धडक देत सिद्धार्थ रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले. या वेळी सिद्धार्थ रुग्णालयाच्या प्रशासनाला निवेदनपर पत्र देऊन जाब विचारला. तसेच सिद्धार्थ रुग्णालय बंद करण्याचा निर्णय झालेला असताना बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) व पावसाळी अतिदक्षता विभाग सुरू ठेवण्यास मनसैनिकांनी रुग्णालय प्रशासनास भाग पाडले, अशी माहिती वीरेंद्र जाधव यांनी दिली.
दररोज हजार ते दीड हजार रुग्ण या हॉस्पिटलमध्ये ओपीडीत उपचार घेत असतात. तसेच डायलिसीस, सिटीस्कॅन या विभागात सतत रुग्ण येत असतात. अचानक हॉस्पिटल बंद होणार असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. कूपर, शताब्दी आणि भगवती अशा सर्व ठिकाणी रुग्ण हलविण्यात येत असून याचा त्रास रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होत आहे. अचानकपणे गोरेगावकरांवर हा प्रशासनाचा निर्णय थोपविला गेला आहे, असा आरोप जाधव यांनी केला. १० दिवसांत पावसाळा सुरू होईल. त्यात साथीचे रोग वेगाने पसरतात. अशा परिस्थितीत एखादा रुग्ण अत्यवस्थ झाला तर शताब्दी, भगवती या रुग्णालयात नेईपर्यंत रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे. आजच्या काळात गोरेगाव भगतसिंग नगर, लक्ष्मी नगर येथील १०० टक्के स्थानिक लोक सिद्धार्थ रुग्णालयात उपचारासाठी येतात. अशा परिस्थितीत रुग्णालय बंद केले तर स्थानिक लोकांनी उपचारासाठी कुठे जायचे, असा सवाल मनसेने केला आहे.