Join us

नाताळ-नववर्ष विशेष गाड्यांमुळे रेल्वेच्या तिजोरीत पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:18 IST

१८ हजार जणांनी केला प्रवास : १ कोटी २० लाख रुपये जमा

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे नाताळ आणि नववर्षानिमित्त कोकण रेल्वेवर चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांमुळे तिजोरीत भर पडली आहे. या काळात या मार्गावर नऊ विशेष गाड्या चालविण्यात आल्या. त्यातून १८ हजार १२६ प्रवाशांनी प्रवास केला असून, रेल्वेकडे १ कोटी २० लाख ५७ हजार रुपये जमा झाले आहेत.

नाताळ आणि नववर्षाचे सेलीब्रेशन करण्यासाठी दरवर्षी देशभरातून पर्यटक गोव्यात दाखल होतात. यापैकी अधिकांश जण रेल्वेने प्रवास करीत असल्यामुळे मध्य रेल्वे या काळात कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या चालविते. १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ या काळात मुंबई-करमळी, मुंबई-मडगाव, पुणे-मंगळुरू अशा नऊ विशेष गाड्या या मार्गावर चालविण्यात आल्या होत्या.

दरम्यान, हिवाळ्यातही गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. त्यामुळे या हंगामात एकूण १३ गाड्या चालविण्यात आल्या. यामधून एकूण २५ हजार २८९ प्रवाशांनी प्रवास केला. यातून रेल्वेच्या तिजोरीत २ कोटी २ लाख ५५ हजार रुपये जमा झाले आहेत. शिवाय पुणे-निजामपूर, मुंबई-नागपूर या मार्गावरही पर्यटकांची गर्दी होत असल्याने येथेदेखील मध्य रेल्वेच्या वतीने जादा गाड्या सोडण्यात आल्या. एकूण १३ गाड्यांपैकी ४ जादा गाड्या पुणे- निजामपूर, मुंबई-नागपूर, पुणे-जबलपूर येथे चालविण्यात आल्या. मा मार्गावर धावलेल्या मेल, एक्स्प्रेसमधून ७ हजार १६३ प्रवाशांनी प्रवास केला. यातून तिजोरीत ८१ लाख ९९ हजार रुपये जमा झाले.

टॅग्स :रेल्वे