अटकेच्या भीतीने नायर न्यायालयात
By Admin | Updated: December 15, 2014 01:04 IST2014-12-15T01:04:11+5:302014-12-15T01:04:11+5:30
पोलिसांनी ठग दाम्प्त्याला अटक करताच आपल्यालाही अटक होणार या भीतीने नायरने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

अटकेच्या भीतीने नायर न्यायालयात
मुंबई : मुलुंडमध्ये दुकानगाळा घेण्याच्या बहाण्याने एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक करणा-या ठग दाम्प्त्याबरोबरच गुन्ह्यातील सहआरोपी असलेल्या नायर हिचा महत्त्वाचा सहभाग असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी ठग दाम्प्त्याला अटक करताच आपल्यालाही अटक होणार या भीतीने नायरने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
मुलुंड जलाराम मार्केटमध्ये गाळा मिळवून देण्याच्या बहाण्याने ठग दाम्पत्य राजेश खानविलकर आणि अनिता खानविलकर यांनी तक्रारदार महिलेची १० लाखांंची फसवणूक केली होती. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून शुक्रवारी या दाम्प्त्याला अटक केली. या दोघांना अटक झाल्याने आपल्यामागेही पोलिसांंचा ससेमिरा लागणार या भीतीने मिताली नायरने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच राजेश खानविलकर हा मिताली नायरचा भाऊ असल्याचे समोर आले.
आरोपी दाम्पत्य तक्रारदार महिलेस लाखोंंचा चुना लावून पसार झाले, तेव्हा नायरने आरोपींना पाठीशी घालण्यासाठी तक्रारदार महिलेस पुढच्या तारखेचे चेक दिले होते. तक्रार करू नये म्हणून तिच्यावर दबाव आणला. मात्र बँकेतून चेक न वटल्याने यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने मुलुंड नवघर पोलीस ठाणे गाठून या त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल केला.
यामधील नायरच्या अटकपूर्व जामिनावर २४ तारखेला सत्र न्यायालयात सुनावणी होणार असल्याने महिलेस अद्यापही अटक करण्यात आलेली नसल्याचे तपास अधिकारी एस. शिगवण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)