खवा, माव्याची मिठाई ४८ तासांत संपवा !
By Admin | Updated: November 12, 2015 02:58 IST2015-11-12T02:58:21+5:302015-11-12T02:58:21+5:30
दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या हजारो मिठायांनी बाजार सजला आहे. पाडवा आणि भाऊबीजसाठी मोठ्या प्रमाणात खवय्यांकडून मिठाईची खरेदी केली जाते.

खवा, माव्याची मिठाई ४८ तासांत संपवा !
मुंबई : दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या हजारो मिठायांनी बाजार सजला आहे. पाडवा आणि भाऊबीजसाठी मोठ्या प्रमाणात खवय्यांकडून मिठाईची खरेदी केली जाते. पण खवा-माव्यापासून तयार केलेल्या मिठाई खाण्याची मुदत ४८ तास म्हणजे दोन दिवस, तर बंगाली मिठाईची मुदत फक्त ८ तास असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
दिवाळीत मिठाईची हजारो किलो विक्री होते. मिठाई, पेढ्यांची मागणी वाढल्याने यात भेसळ होण्याचा धोका अधिक असतो. भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने विषबाधा होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी एफडीए सज्ज झाली आहे. मुंबई आणि राज्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, म्हणून एफडीएचे अधिकारी कार्यरत असल्याचे एफडीएचे साहाय्यक आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी सांगितले. बंगाली मिठाई आठ तासांनंतर खायची असल्यास ती फ्रीजमध्ये ठेवावी. त्यामुळे हा अवधी आणखी ५-६ तासांनी वाढू शकतो, असे अन्नपुरे यांनी सांगितले.
दिवाळीच्या काळात तेल, तूप, रवा, मैदा, खवा, मावा, तूप, वनस्पती या जिन्नसांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. या जिन्नसांचे आत्तापर्यंत ८० ते ८५ नमुने एफडीएने तपासणीसाठी घेतले आहेत. (प्रतिनिधी)