ड्रग्ज माफियांचे मूळ महाड एमआयडीसीत
By Admin | Updated: March 4, 2015 02:48 IST2015-03-04T02:48:15+5:302015-03-04T02:48:15+5:30
मागील आठवड्यात मुंबईत एमडी पावडरची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी पकडल्यानंतर या ड्रग्ज माफियांचे मूळ महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

ड्रग्ज माफियांचे मूळ महाड एमआयडीसीत
महाड : मागील आठवड्यात मुंबईत एमडी पावडरची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी पकडल्यानंतर या ड्रग्ज माफियांचे मूळ महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
एमडी पावडर नामक ड्रग्जचे उत्पादन करणाऱ्या महाड औद्योगिक वसाहतीमधील रोहन केमिकल्स प्रा. लिमिटेड या कारखान्यावर नॉर्कोडीस कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी छापा घालून तयार मालाच्या गोदामासह कारखाना सील केला आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून एनसीबीचे हे पथक या कारखान्यात तळ ठोकून असून, या कारखान्यात अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्याच्या माहितीला या पथकातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असला तरी याबाबत अधिक माहिती मात्र देण्यास स्पष्ट नकार दिला.
२७ फेब्रुवारी रोजी गुजरातमधून मुंबईत एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला मुंबईत अंधेरी येथे एनसीबीने अटक करुन त्यांच्याकडून २५ किग्रॅ. एमडी पावडर (अंदाजे किंमत ५ करोड रु.) जप्त केली होती. ड्रग्ज तस्करी
करणारे हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असून
या टोळीकडून मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या पथकाला याचे मूळ महाड औद्योगिक वसाहतीमधील रोहन केमिकल्स कारखाना असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या विषेश पथकाने या कारखान्यावर छापा घातला.
महाड औद्योगिक वसाहत ई/२६-३ या प्लॉटवरील प्रभाकर गवस हे रोहन केमिकल्सचे संचालक असून ते मुंबई मालाड येथे राहतात. मात्र कारखान्यावर छापा टाकल्याची माहिती मिळूनही ते तीन दिवसांनंतरही कारखान्यात फिरकलेच नसल्याची माहिती मिळाली.
या कारखान्यात कुणीही जबाबदार अधिकारी
देखील नव्हता. मात्र या कारखान्यात वीस दिवसांपूर्वीच नोकरीस लागलेल्या विजय करंजकर यांनी कारखान्याबाबत उपलब्ध माहिती या पथकातील अधिकाऱ्यांना दिली असून कारखान्यातील प्रत्येक कामगाराची या पथकाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
तीन दिवसांनंतरही या पथकातील अधिकाऱ्यांसमोर चौकशीस सामोरे न गेल्यामुळे कारखान्याच्या मालकांबाबतही अधिक संशय बळावत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यात एमडीचा समावेश झाल्यानंतर आठवड्याभरातच त्याची तस्करी करणारी टोळी एनबीसीने जेरबंद केल्यामुळे या तस्करीचे मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
याबाबत एनबीसीचे मुंबई झोनल आॅफिसर कुमार संजय झा यांच्याशी मुंबईतील कार्यालयात संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. (वार्ताहर)