महिलांच्या पुढाकाराने धोदानी झाले दारूमुक्त
By Admin | Updated: March 31, 2015 22:20 IST2015-03-31T22:20:50+5:302015-03-31T22:20:50+5:30
धोदानी परिसरातील सर्व वाड्या आणि पाडे दारूमुक्त झाले असून, या भागात चोरीछुपके सुरू असलेल्या दारूच्या भट्ट्या व दुकाने बंद झाली आहेत.

महिलांच्या पुढाकाराने धोदानी झाले दारूमुक्त
पनवेल : धोदानी परिसरातील सर्व वाड्या आणि पाडे दारूमुक्त झाले असून, या भागात चोरीछुपके सुरू असलेल्या दारूच्या भट्ट्या व दुकाने बंद झाली आहेत. कायदा- सुव्यवस्थेला पाठबळ मिळाल्याने तंट्यांची संख्या घटली. याकरिता नवीन पनवेल पोलिसांनीही ठोस पावले उचलली आहेत.
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या मालडुंगे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मालडुंगे, धोदाणी, देहरंग, धामणी या गावांसोबतच हौशाची वाडी, कुंभटेकडी, ताडपट्टी, सतीची वाडी, टावर वाडी, चिंच वाडी, वाघाची वाडी, बापदेव वाडी, कोंडीची वाडी या वाड्या येतात. त्यामध्ये धोदानी शेवटच्या टोकाचे गाव. पनवेलपासून १६ किमी अंतरावर असलेल्या या भागात एकूण ४०९४ लोकसंख्या आहे.
डोंगर, कडा, कपाऱ्या, दाट झाडी असलेल्या या पट्ट्यात पायाभूत सुविधांची वानवा असली तरी हातभट्ट्यांचा सुकाळ होता. जंगलात भट्ट्या टाकून त्या ठिकाणी गावठी दारू तयार केली जात असे. त्याचबरोबर बाहेरूनही दारू या गावांमध्ये विक्रीकरिता आणली जायची. एकंदरीत आदिवासी समाजातील अनेक पुरुष दारूच्या अधीन झाले होते.
अनेकांचा मृत्यू झाला, तर काहींना आजार जडला. इतकेच नाही तर तरुण पिढीही दारूच्या आहारी गेल्याने बरबाद होण्याच्या मार्गावर होती. दारू पिऊन दोन गटांत हाणामारी होण्याचे प्रमाणही वाढले होते. पोलीस ठाणेही दूर असल्याने या ठिकाणच्या विक्रेते व तळीरामांवर वचक ठेवणे कठीण होते. यावर तोडगा काढण्याकरिता चंद्रकांत खैर, जान्या भगत, शंकर घुटे, मंगेश चौधरी, आदिवासी सेवा संघाचे गणपत वारगडा यांनी पुढाकार घेतला. त्यांना सर्व महिला बचत गटाने सहकार्य करण्याची ग्वाही दिली. (वार्ताहर)