वीजवाहिन्यांवरील दोषांचा शोध घेतेय ड्रोनची नजर; महापारेषणने लढवली शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 01:48 IST2020-07-19T01:48:09+5:302020-07-19T01:48:23+5:30
देखभालीसह तत्काळ दुरुस्तीही शक्य

वीजवाहिन्यांवरील दोषांचा शोध घेतेय ड्रोनची नजर; महापारेषणने लढवली शक्कल
मुंबई : केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागामार्फत परवानगी घेऊन उच्च दाब वीजवाहिन्यांची निगा राखण्याचे काम महापारेषण ड्रोनद्वारे करीत आहे. विशेषत: दुर्गम भागातून जाणाऱ्या पारेषण वाहिन्यांची कामे करताना ड्रोनचा चांगला उपयोग होत असल्याचा महापारेषणचा दावा आहे.
नियमानुसार ड्रोन ५० मीटर उंचीपर्यंत उडविता येतो. त्याचे पालन करून ड्रोनद्वारे कामे करण्यात येत आहेत. यात ग्राउंड पेट्रोलिंग, टॉवर टॉप पेट्रोलिंग, सर्व्हे आदींचा समावेश आहे. यामुळे महापारेषणचा वेळ, पैसा, मनुष्यबळाची बचत होत आहे. पारेषण वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे कामही ड्रोनद्वारे करण्यात येत असल्यामुळे ती जलद करणे शक्य होत असल्याचे महापारेषणचे म्हणणे आहे.
ड्रोनवर व्हिडीओ कॅमेरा तसेच थर्मोव्हिजन कॅमेरा लावण्यात आल्यामुळे पारेषण वाहिन्यांवर निर्माण होणारे विविध दोष त्वरित निदर्शनास आणून त्यांची तत्काळ दुरुस्ती करणे शक्य होत आहे. वीज क्षेत्रात ड्रोनद्वारे काम करणारी महापारेषण देशातील एकमेव कंपनी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
असा होतो उपयोग
नवीन प्रकल्पात सर्वेक्षण करण्यासाठीही ड्रोन कॅमेराचा उपयोग होणार आहे. टॉवरच्या अगदी जवळ जाऊन ड्रोनद्वारे तपासणी शक्य आहे. त्यामुळे हे डायग्नोस्टिक टूल ठरले आहे. तसेच कार्यालयात बसून ड्रोनची हालचाल पाहणेही शक्य झाले आहे.