Join us  

वाहन चालकांना वेगाचा मोह आवरेना; मुंबईत वेगाला लगाम लावण्यासाठी आणखी १३ ‘इंटरसेप्टर’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 10:51 AM

रस्ते अपघातासाठी वाहनांचा वेग हे महत्त्वाचे कारण ठरत आहे.

मुंबई : रस्ते अपघातासाठी वाहनांचा वेग हे महत्त्वाचे कारण ठरत आहे. दरवर्षी जवळपास एक लाख मृत्यू होत आहेत. असे असले तरी चालकांना वेगाचा मोह आवरत नसल्याचे दिसून येत आहे. या वेगाला लगाम लावण्यासाठी परिवहन विभागाच्या (आरटीओ) वायूवेग पथकाला १८७ इंटरसेप्टर वाहने मिळणार आहेत. त्यातील १३ इंटरसेप्टर मुंबईत येणार असून त्यांची चालकांवर नजर असणार आहे. 

नियम पाळला नाही म्हणून वाहतूक पोलीस चलन फाडण्यात धन्यता मानतात. मात्र चालकाने नियम मोडल्याची कुठलीही नोंद कुठेही होत नसल्यामुळे तोच नियमभंग पुन:पुन्हा केला जातो आणि त्यातूनच चालकांचा बेदरकारपणा वाढत चालला आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या ताफ्यात १८७ इंटरसेप्टर येणार आहेत. 

नियम पालन केल्यास टळणार अपघात :

 वाहनचालकांची वाहतूक पोलिसाकडे दंड भरण्याची त्यांची तयारी असते, परंतु स्वत:च्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेला नियम पाळण्यात त्यांना रस नसतो. वाहतुकीचे नियम हे वाहनचालकांसाठी आहेत.

 त्यांनी वेगाने वाहन चालविणे, सीटबेल्ट किंवा हेल्मेट हे पाळायला हवेत. या नियमाचे पालन जर केले तर मोठ्या प्रमाणात अपघात कमी होतील, असे मत वाहतूकतज्ज्ञांनी व्यक्त केले. 

रस्ते अपघातात भरधाव वेग प्रमुख कारण आहे. त्याला इंटरसेप्टर वाहनांमुळे आळा बसेल. परिवहन विभागाला  मिळणाऱ्या १८७ इंटरसेप्टर वाहने मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. येत्या मार्चपर्यंत  १८७ इंटरसेप्टर वाहने परिवहन विभागाकडे येतील. त्याची आवश्यक ती चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ताफ्यात समावेश केला जाईल.- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

मुंबईत भरधाव वेगाने वाहन चालवण्यामध्ये दुचाकीचे प्रमाण जास्त आहे. ४७ टक्के अपघात हे दुचाकींचे होतात. यामध्ये विशेषतः लेन कटिंग आणि सिग्नल जम्पिंगमध्ये झालेल्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. - डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूकतज्ज्ञ

टॅग्स :मुंबईवाहतूक पोलीस