बेस्टच्या अपघातात चालक-वाहक जखमी

By Admin | Updated: December 21, 2014 01:14 IST2014-12-21T01:14:04+5:302014-12-21T01:14:04+5:30

घाटकोपर आणि कुर्ला येथे सलग दोन दिवस झालेल्या बेस्ट अपघातात चालक आणि वाहक जखमी झाल्याची घटना घडली.

Driver-carrier injured in BEST accident | बेस्टच्या अपघातात चालक-वाहक जखमी

बेस्टच्या अपघातात चालक-वाहक जखमी

मुंबई : घाटकोपर आणि कुर्ला येथे सलग दोन दिवस झालेल्या बेस्ट अपघातात चालक आणि वाहक जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पंतनगर आणि कुर्ला पोलीस ठाण्यात या दोन्ही बसचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
वाशी येथील एपीएमसी मार्केट येथून बोरीवलीकडे जाणाऱ्या बेस्टच्या ५२४ क्रमांकाच्या बसचा दरवाजा अचानक उघडल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली. सकाळी सातच्या सुमारास घाटकोपर जंक्शन येथून जात असताना हा अपघात झाला. चालकाच्या बाजूचा दरवाजा अचानक उघडला गेल्याने तो बंद करताना चालकाचा ताबा सुटला आणि बस जवळच्या उद्यान नर्सरीच्या प्रवेशद्वाराजवळ धडकली. यात चालक प्रल्हाद काशीनाथ तऱ्हाळे (४८) हे जखमी झाले. त्यांना तत्काळ जवळच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पंतनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी बेदरकारपणे वाहन चालविल्याने तऱ्हाळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर धनावडे यांनी सांगितले.
शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास एपीएमसी मार्केट येथून सांताक्रूझच्या दिशेने जात असताना बेस्टच्या ५१० मार्गाच्या बसचा तोल जाऊन कुर्ला येथे अपघात झाल्याची दुसरी घटना समोर आली. सुसाट वेगाने निघालेली बस कुर्ला एलबीएस या रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दोन ट्रकना धडकली. यात वाहक सचिन प्रकाश शिंदे (२९) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)

शुक्रवारी झालेल्या अपघाताच्या घटनेत बेदरकारपणे वाहन चालविल्याने तऱ्हाळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शनिवारी झालेल्या अपघात प्रकरणी चालक बाबाजी आनंदराव घोडगेविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Driver-carrier injured in BEST accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.