Siddhivinayak Temple Dress Code: असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्दिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी आता ड्रेस कोड पाळावा लागणार आहे. काही भाविकांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यासच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर प्लास्टिक बंदीचाही निर्णय घेण्यात आला आहे. (what is siddhivinayak temple dress code)
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे सदस्य राहुल लोंढे यांनी न्यासने घेतल्या निर्णयांबद्दल माहिती दिली.
श्री सिद्धिविनायक न्यासच्या बैठकीत काय ठरले?
राहुल लोंढे म्हणाले की, "मंडळाच्या विश्वस्तांची बैठक झाली. मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. काही भक्तांच्या तक्रारी, तर काहींच्या सूचना न्यासकडे आल्या होत्या. मंदिरात काही भाविक येतात. ते कुठल्या जातीचे, धर्माचे पंथाचे असतील. स्त्री असो वा पुरुष. अनेकांचे पेहराव हे समोरच्या व्यक्तींना संकोच वाटेल असे होते."
"काही भाविक कसेही पेहराव करून येतात. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की, पुढच्या आठवड्यापासून सिद्धिविनायक मंदिरात येणारा जो भक्त असेल, त्याचा पेहराव शालीनता आणि पावित्र्य जपणारा असावा. आपण मंदिरात येऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतोय. त्याचे पावित्र्य जपले जाईल, अशा प्रकारचा पेहराव भाविकांचा असायला हवा", अशी माहिती लोंढे यांनी दिली.
कोणत्या भक्तांना दिला जाणार नाही प्रवेश?
"अमूक एक प्रकारचा पेहराव घालावा किंवा अमूक एका पद्धतीचे कपडे घालावेत असे निर्बंध नाहीत. परंतू जो पेहराव असेल, तो इतर भक्तांना संकोच वाटणारा नसावा. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. भाविकांनी वेडावाकडा पेहराव न करता यावे. पण, यापुढे तोकडे कपडे किंवा इतर भक्तांना संकोच वाटेल अशा प्रकारचे कपडे घालून येणाऱ्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही", असा निर्णय घेण्यात आला असल्याचे लोंढे यांनी सांगितले.