‘त्यांचे’ आमदारकीचे स्वप्न भंगले

By Admin | Updated: October 22, 2014 22:51 IST2014-10-22T22:51:25+5:302014-10-22T22:51:25+5:30

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदारकीचे स्वप्न बघणाऱ्या सहा विद्यमान आणि तीन माजी नगरसेवकांचे हे स्वप्न भंगल्याचे उघड झाले आहे.

The dream of 'their' MLAs broke | ‘त्यांचे’ आमदारकीचे स्वप्न भंगले

‘त्यांचे’ आमदारकीचे स्वप्न भंगले

ठाणे - विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदारकीचे स्वप्न बघणाऱ्या सहा विद्यमान आणि तीन माजी नगरसेवकांचे हे स्वप्न भंगल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांना पडलेल्या मतांवर ते यापुढे आमदार होऊ शकतात अथवा नाही, हे देखील यातून स्पष्ट झाले आहे.
ठाणे शहरातील चार विधानसभा मतदार संघातून या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक हे ओवळा माजिवडा मतदारसंघात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यामध्ये राष्ट्रवादी, कॉंग्रेस, मनसे आणि एका अपक्ष नगरसेवकाचा समावेश आहे. तर ठाणे शहर मतदार संघात, कॉंग्रेसच्या एका नगरसेवकाने आपले नशिब आजमावले होते. तसेच शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविणारे माजी नगरसेवक रवींद्र फाटक याचाही यात समावेश आहे.
विशेष म्हणजे कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघात एकही नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात नसल्याचे दिसून आले आहे. मुंब्रा - कळवा मतदारसंघात कॉंग्रेसकडून एक नगरसेवक रिंगणात होता. तर भाजपाच्या एका माजी नगरसेवकाला पराभवाची चव चाखावी लागली.
ओवळा - माजिवडा मतदारसंघातून ठाणे मनपाचे अपक्ष नगरसेवक संजय पांडे यांना भाजपाकडून उमेदवारी दिली होती. त्यांनी तब्बल १८ व्या फेरीपर्यंत शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यावर आघाडी मिळविली होती. परंतु, त्यानंतर त्यांचा पराभव झाला. त्यांना ५७ हजार ६६५ मते मिळाली.
तर याच मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीत उतरलेले मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचाही पराभव झाला असून, त्यांना २० हजार ५६८ मते मिळाली.
मीरा भाईंदरच्या कॉंग्रेसच्या नगरसेविका प्रभात पाटील यांना १३ हजार ५२९ मते मिळाली. याशिवाय ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते पदी असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनाही पहिल्यांदा आमदारकीच्या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली. त्यांना केवळ २० हजार ६८६ मते मिळाली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The dream of 'their' MLAs broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.