पेट्रोलपंपावर दरोड्याचा प्रयत्न फसला

By Admin | Updated: October 6, 2014 04:08 IST2014-10-06T04:08:49+5:302014-10-06T04:08:49+5:30

पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेने शिताफीने उधळून लावला. दरोडा टाकण्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेने सापळा रचून चौघांच्या टोळीला अटक केली

Drama efforts on petrol pump were unsuccessful | पेट्रोलपंपावर दरोड्याचा प्रयत्न फसला

पेट्रोलपंपावर दरोड्याचा प्रयत्न फसला

नवी मुंबई : पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेने शिताफीने उधळून लावला. दरोडा टाकण्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेने सापळा रचून चौघांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, दोन काडतुसे, सुरी, चॉपर असे दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे याच टोळीने वर्षभरापूर्वी याच पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
कळंबोली स्टील मार्केट येथील पेट्रोलपंपालगत पोलिसांनी ही कारवाई केली. तेथील टाऊन डिझेल पेट्रोलपंपावर दरोडा पडणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी रात्री तेथे सापळा रचला होता. पेट्रोलपंपालगतच्या बंद कंपनीच्या
आवारात तसेच उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये पोलीस दबा धरून बसले होते.
या दरम्यान पेट्रोलपंपापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वेरुळावर काही जण असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सदर अज्ञात व्यक्ती पेट्रोलपंपाच्या दिशेने येत असतानाच पोलिसांनी त्यांना घेराव घातला. या वेळी झालेल्या झटापटीत चौघांना पोलिसांनी पकडले तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. मुस्तकीन सुबराती चौधरी ऊर्फ मुन्ना (२७), अल्ताफ नईम खान (२४), लालू त्रिवेणी गुप्ता (२४) आणि मुबारक सलीउल्ला खान (४२) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. मात्र त्यांच्या एका फरार साथीदाराचे नाव पोलिसांना कळलेले नाही. अटक केलेल्या चौघांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, दोन काडतुसे, सुरी, चॉपर व मिरची पावडर असे दरोड्यासाठी वापराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
टोळीतील मुस्तकीन आणि मुबारक हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कळंबोली, तुर्भे, बोईसर आदी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या चौघांना १० आॅक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली असून, त्यांचा अधिक तपास सुरू असल्याचे मोहिते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Drama efforts on petrol pump were unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.