Join us  

ट्रेंडिंगच्या 'किकी चॅलेंज' चे वाहतूक पोलिसांना नवे आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 10:42 AM

रस्ते अपघात रोखण्यासाठी चॅलेंज न स्वीकारण्याचे ट्विटरवरून केले आवाहन 

महेश चेमटे

मुंबई : समाजमाध्यमावर विविध ट्रेंड सुरू झाल्यानंतर नेटिझन्स कोणताही विचार न करता या ट्रेंडमध्ये वाहत गेल्याचे दिसून येते. नेटिझन्सच्या अशा वागण्यामुळे कधी स्वतः सह अन्य नागरिकांचे प्राण ही धोक्यात घालत आहे. यामुळे ट्विटर रील ट्रेंडिंगमध्ये असलेल्या #किकी चॅलेंजमुळे मुंबईतील वाहतूक पोलिसांसमोर सुरक्षा आणि अपघात रोखण्याचे नवे आव्हान उभे असल्याचे स्पष्ट होत आहे. 

ट्विटर, फेसबुक यासारख्या समाज माध्यमांमुळे जग जोडले गेले हे जरी खरं असलं तरी त्याचा दुष्परिणाम ही आहेत. सध्या ट्विटरवर किकी चॅलेंज हा ट्रेंड सुरू आहे. ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये असलेल्या या किकी चॅलेंजनुसार चालत्या चारचाकी वाहनाचे दरवाजे उघडून नाचणे आणि तो व्हिडिओ '#किकीचॅलेंज' हा हॅशटॅग वापरून ट्विटरवर अपलोड करण्याचा प्रकार सुरू आहे. अशा भर रस्त्यात अशा कृत्यामुळे नेटिझन्स आपले प्राण धोक्यात घालतात. शिवाय रस्त्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहत आहे. किकी चॅलेंजनुसार आतापर्यंत अनेक अपघात झाल्याचे उदाहरण समोर येत आहे.

मुंबईत होत असलेल्या मेट्रोच्या विकासकामामुळे आधीच वापरण्यासाठी उपलब्ध असलेला रस्ता अरुंद होत आहे. त्यातच आता रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे मुंबईकरांच्या वाहतुकीचा वेग मंदावला आहे. शिवाय लोअर परळ पूल, अंधेरी पूल, कलानगर पूल यासारखे वाहतुकीसाठी महत्त्वाचे असणारे पूल मार्ग बंद झाल्याने मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीमुळे नेटिझन्स मोठया प्रमाणात वाहतूक पोलिसांच्या विरोधात ट्विटवर व्यक्त होत आहेत. याचबरोबर आता वाहतूक पोलिसांसमोर किकी चॅलेंजला रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. 

 

सेलिब्रिटींना ही भुरळ 

ट्विटर ट्रेंडीगवरील किकी चॅलेंजने सेलिब्रिटींनी देखील भुरळ घातल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका प्रसिद्ध जुन्या हिंदी चित्रपट गीताच्या 'रिमेक' मधील अभिनेत्री किकी चॅलेंजनुसार नाचताना दिसत आहे. या अभिनेत्रीने स्वतः चा व्हिडिओ #किकी चॅलेंज हा हॅशटॅग वापरून अपलोड केला आहे. या व्हिडीओवर नेटिझन्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

#इन माय फिलिंग सेफ्टी चॅलेंज - वाहतूक पोलीस

भारतासह स्पेन, यूएस, मलेशिया, युएइ सारख्या देशामध्ये हा ट्रेंड कमालीचा व्हायरल होत आहे. स्पेनमधील वाहतूक पोलिसांनी किकी चॅलेंज करताना नागरिक आढळल्यास एक हजार डॉलर आणि गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांनी किकी चॅलेंज विरुद्ध सध्या तरी कोणताच दंडाची घोषणा केलेली नाही मात्र मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून असे कृत्य केल्यास कोणत्या परिणामाला सामोरे जावे लागेल अशा आशयाचा व्हिडीओ ट्विट करत #इन माय फिलिंग सेफ्टी चॅलेंज हा हॅशटॅग वापरला आहे.

काय आहे किकी ?

कॅनडा येथील प्रसिद्ध गायक ड्रेकने #इन माय फिलिंग या हॅशटॅगने एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला. या पोस्टनुसार गायक  चालत्या गाडीतून खाली उतरून नाचू लागला आणि पुन्हा गाडीत बसला. #इन माय फिलिंग ला #किकीचॅलेंज असे ही संबोधले जात असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :मुंबई पोलीसमुंबईवाहतूक पोलीस