गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!

By मनीषा म्हात्रे | Updated: May 31, 2025 06:48 IST2025-05-31T06:48:11+5:302025-05-31T06:48:39+5:30

रस्त्यावरच्या धुळीचा रहिवाशांना फटका

Drain cleaning contractors and municipal officials also manipulate the site for silt emptying | गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!

गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!

मनीषा म्हात्रे

मुंबई : नालेसफाईतील भ्रष्टाचाराबरोबरच गाळ रिकामा करण्याच्या जागेतही ठेकेदार, पालिका अधिकारी हेराफेरी करताना दिसत आहेत. लॉगशीटवर असलेले डम्पिंगचे ठिकाण नावाला असून बऱ्याच ठिकाणी खासगी जागेवर अनधिकृतपणे हा माल उतरवला जात असल्याचे दिसून येत आहे. पालिकेकडून नाल्यातील गाळ टाकण्यासाठी ठरावीक जागा घेण्यात आल्या. गाळ सुकल्यानंतर तो दुसऱ्या ठिकाणी टाकला जातो. मात्र, प्रत्यक्षात गाळाऐवजी बांधकाम साईटवरील माती टाकण्यात येत असल्याने काही ठिकाणी ती रस्त्यावर येऊन त्याचा नाहक फटका सर्वसामान्यांना बसताना दिसत आहे. देवनार, मानखुर्द शिवाजीनगर भागात याबाबतच्या तक्रारीचा सूर वाढत आहे.

स्टिंग ऑपरेशनदरम्यान लॉगशीटमध्ये सर्व्हे क्रमांक २७/७ ही भिवंडीच्या गुंदवली गावातील जागा नमूद होती. मात्र, प्रत्यक्षात हा माल भिवंडीच्या दिवे गावातील एका खासगी जागेवर उतरविण्यात आला. तिथेही उतरविणाऱ्या मालाची पाहणी करण्यासाठी कुठलाही अधिकारी उपस्थित नव्हता. कामगारानेच मोबाईलमध्ये फोटो काढून अपलोड केले.

देवनार पालिका वसाहत परिसरात धुळीचा त्रास

देवनार बीएमसी कॉलनी, साठेनगर मानखुर्द, घाटकोपर लिंक रोड परिसरात खाडी, नाल्यालगत असलेल्या खासगी जागेतही हा 'काला माल' उतरविण्यात येत आहे. या ठिकाणी येणाऱ्या मालवाहू ट्रकमधील मातीच्या धुळीमुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. देवनार पालिका वसाहत, शाळांसह आजूबाजूच्या वस्त्यांना याचा फटका बसतो आहे.

नियंत्रण ठेवणारेही संशयाच्या घेऱ्यात

नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, अशा पद्धतीने सुरू असलेल्या हेराफेरीमुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. त्यामुळे प्रशासन यामध्ये काय कारवाई करते? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

विक्रोळीच का बनतेय 'काला माल'चे हब? 

विक्रोळी खाडीलगत सुरू असलेल्या बांधकाम साईटवर ३ फुटाच्या खाली खोदकाम झाल्यास मोठ्या प्रमाणात चिखलासारखा काळा माल दिसून येतो. तो गाळाप्रमाणे दिसत असल्याने त्याला मार्गी लावण्यात अडचणी येत नाही. मुंबईतील विविध वॉर्डातील गाड्या त्यासाठी याठिकाणी येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि टेम्पोमालक गणेश घाडगे यांनी सांगितले.
 

Web Title: Drain cleaning contractors and municipal officials also manipulate the site for silt emptying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.