Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. विनोद करकरे यांचा उत्कंठा भाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 08:51 IST

डॉ. विनोद करकरे स्वतः जिद्दीने डॉक्टर झाले. पंचविसाव्या वर्षी त्यांना पदव्युत्तर एमएस ही पदवी मिळाली. त्यापलीकडील डॉक्टरी तज्ज्ञतेच्या मुंबई-दिल्लीच्या अनेकविध पदव्या त्यांच्याकडे आहेत. त्यांनी विविध प्रकारच्या शेकडो शस्त्रक्रिया केल्या आहेत. तरीही ते आग्रहाने सांगतात, की रुग्णाची शस्त्रक्रिया टाळावी!

‘पैसा नव्हे, कीर्ती मिळो द्यावी’, असे घोषवाक्य व्हिजिट कार्डावर छापणारे तज्ज्ञ, ज्येष्ठ डॉक्टर विनोद करकरे यांचे कार्डावरील दुसरे वाक्य आहे, ‘रिपोर्ट नव्हे, रोगी तपासावा !’ अशी कालविसंगत मनोधारणा असलेले करकरे चेंबूरला श्री नावाचे हॉस्पिटल गेली चार दशके यशस्वीपणे चालवत आहेत. ते स्वतः शस्त्रक्रिया करतातच; पण ‘रुग्णसेवा’ म्हणून तेवीस डॉक्टरांना वेगवेगळ्या रोगांवर उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देतात. डॉक्टरने रोग्याला बरे होऊ द्यावे - शक्यतो त्याला तपासण्या-शस्त्रक्रिया यांत अडकवू नये, अशी करकरे यांची धारणा दिसते.

करकरे स्वतः डॉक्टर जिद्दीने झाले - पंचविसाव्या वर्षी त्यांना पदव्युत्तर एमएस ही पदवी मिळाली. त्यापलीकडील डॉक्टरी तज्ज्ञतेच्या मुंबई-दिल्लीच्या अनेकविध पदव्या त्यांच्याकडे आहेत. पण तो इतिहास झाला. त्यांनी डॉक्टर होताच बाँबे पोर्ट ट्रस्ट रुग्णालयात आठ वर्षे नोकरी केली. त्यांनी विविध प्रकारच्या शेकडो शस्त्रक्रिया केल्या आहेत. मात्र ते तज्ज्ञ ऑर्थोपेडिक विभागातील मानले जातात आणि तरीही ते आग्रहाने सांगतात, की रुग्णाची शस्त्रक्रिया टाळावी ! त्यांचा मुलगा नकुल अमेरिकेत न्यू यॉर्कमध्ये प्रसिद्ध व यशस्वी डॉक्टर आहे. दुसरा मुलगा निखिल पुण्यात ‘वॉलनट’ नावाची बालकेंद्री शिक्षणाची शाळा चालवतो. शाळेच्या तीन शाखांत चार हजार विद्यार्थी आहेत! 

डॉक्टर सश्रद्ध आहेत. ‘तो’ डॉक्टराच्या हातून रोग्याला बरा करतो अशी त्यांची भावना आहे. त्यांचा कल आध्यात्मिक आहे. ते आरंभी बेलसरे पंथीय होते. पण त्यांनीच सुचवल्यामुळे डॉक्टर करकरे गोंदवलेकर यांच्या रामभक्ती पंथात गेले. ते दर तीन महिन्यांनी गोंदवल्याला जातातच; पण एरवीही तिकडे जाणाऱ्या एसट्यांकडे मैत्री पार्क स्टॉपवर आस्थेने लक्ष ठेवतात. ड्रायव्हर-कंडक्टर-प्रवासी यांच्यामार्फत रामाशी नाते जोडतात.

द्भुत गोष्ट म्हणजे ते पन्नासाव्या वर्षानंतर गाऊ लागले आणि गाण्यांच्या कार्यक्रमांत भाग घेऊ लागले ! ते शाळा-कॉलेजमध्ये इंग्रजी गाणी म्हणत, पण ती नक्कल असे. ते गेली तीन दशके उमेश खरे आणि किरण कामत या शिक्षकद्वयींकडे गाण्याचे रीतसर शिक्षण घेत आहेत. त्यांचे शंभर गाणाऱ्यांत तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाचे ‘रेटिंग’ आहे. ते वयाची ऐंशी वर्षे पुरी करत असताना त्यांनी गाण्याची चक्क मोठी मैफल योजली आहे. त्यांच्याबरोबर गाण्यास स्त्रीरोगतज्ज्ञ संध्या पुरी आणि अन्य दोघे आहेत. मौज म्हणजे मुलगा नकुल अमेरिकेतून येऊन त्यावेळी दोन गाणी म्हणणार आहे! 

कुतूहल असे, की रुग्णसेवेचा आनंद, रामभक्तीचा ध्यास आणि हिंदी सिनेमांची गाणी गाणे या तीन विभिन्न गोष्टी एका जिवात नांदतात कशा? तर डॉक्टरांचे साधेसोपे उत्तर असे, की त्यांच्या मनातील उत्कंठा भाव ! ती ओढ माणसाला जीवनाचे विविध रंग दाखवते. ते म्हणाले, की त्याच भावनेने ते तलावात जलतरण गेली पन्नास वर्षे करत आले आहेत, त्याही खेळात बक्षिसे मिळवली आहेत.