डॉ. गिरीश ओक यांच्या हस्ते 'सोलमेट'ची दुसरी आवृत्ती प्रकाशित

By संजय घावरे | Published: October 18, 2023 07:06 PM2023-10-18T19:06:06+5:302023-10-18T19:06:15+5:30

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने साठे कॉलेजमध्ये 'वाचू आनंदे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Dr. Second edition of Soulmate published by Girish Oak | डॉ. गिरीश ओक यांच्या हस्ते 'सोलमेट'ची दुसरी आवृत्ती प्रकाशित

डॉ. गिरीश ओक यांच्या हस्ते 'सोलमेट'ची दुसरी आवृत्ती प्रकाशित

मुंबई - वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने साठे कॉलेजमध्ये 'वाचू आनंदे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या हस्ते 'सोलमेट' या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. विश्वभरारी फाउंडेशन आणि साठे कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 'वाचू आनंदे' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. गिरीश ओक या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते लता गुठे यांनी लिहिलेल्या भरारी प्रकाशनच्या 'सोलमेट' या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. लता यांनी लिहिलेले हे २०वे पुस्तक असून, भरारी प्रकाशनचे २५०वे पुस्तक आहे. यावेळी लता म्हणाल्या की, पुस्तके माणसाच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवतात. मुलांनी आत्मचरित्रांचे वाचन करायला हवे. पुस्तके खडतर परिस्थितीतून मार्ग काढायला शिकवतात, तसेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्गही दाखवतात असेही त्या म्हणाल्या. 

विश्वभरारी फाउंडेशनचे कोषाध्यक्ष लेखक प्रशांत राऊत 'सोलमेट'बद्दल म्हणाले की, या कथासंग्रहात एकूण १८ कथा आहेत. प्रत्येक कथेचा विषय आणि आशय वेगळा असल्याने वेगवेगळ्या काळातल्या या कथा तिथल्या बोली भाषा व वातावरण निर्मितीमुळे त्या त्या भागात घेऊन जातात. प्रेम हा प्रत्येक कथेचा आत्मा असल्याचेही राऊत म्हणाले. साठे कॉलेजचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला साठे महाविद्यालयातील शिक्षक तसेच विश्वभरारी फाउंडेशनचे पदाधिकारी विलेपार्लेतील लेखक, वाचक व कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Dr. Second edition of Soulmate published by Girish Oak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई