Join us  

डॉ. बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 1:21 AM

'हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे.'

मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना दिलेल्या संदेशात ठाकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला, त्यांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे प्रेरणास्थान ठरेल. अन्यायग्रस्त, वंचित, आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तसेच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा, न्याय आणि बंधुतेच्या विचारांच्या दिशेने शासनाची वाटचाल राहील. इंदू मिल येथील स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणारे नागरिक आणि भीमसैनिकांचे त्यांनी स्वागत केले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरे