डॉ. आंबेडकर संशोधन केंद्र उभारणार; मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:47 IST2018-05-23T00:47:32+5:302018-05-23T00:47:32+5:30
मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांचे आश्वासन : विद्यार्थ्यांच्या उपोषणाची घेतली दखल

डॉ. आंबेडकर संशोधन केंद्र उभारणार; मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांचे आश्वासन
मुंबई : मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राची उभारणी करण्याचा प्रस्ताव माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या काळात मंजूर झाला होता. मात्र, त्यानंतरही केंद्रासाठी विद्यापीठाला मुहूर्त न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने मंगळवारी विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये आमरण उपोषणास सुरुवात केली. त्याची दखल घेत, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी, त्वरित डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र मुंबई विद्यपीठात उभे राहील व त्या संदर्भात त्वरित पुढील अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन सदर ठिकाणी येऊन दिले. त्यामुळे उपोषण तात्पुरती स्थगित करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यावर आधारित समाजरचनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी, मुंबई विद्यापीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र विद्यापीठात उभारण्यात येणार होते. मात्र, प्रस्ताव मंजूर होऊन अनेक वर्षे उलटली, तरी या केंद्रास मुहूर्त न मिळाल्याने रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने मंगळवारपासून आमरण उपोषणाची हाक दिली होती.
... तर तीव्र आंदोलन
केंद्रासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात १० लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र, सतत ३ वर्षे निधी प्राप्त होऊनही यातील एकही पैसा अद्याप खर्च करण्यात आलेला नाही. आता विद्यापीठाने हे केंद्र लवकरच सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले असले, तरी ते पूर्ण न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करू.
- आशिष गाडे, अध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना.