प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तीचे विसर्जन सार्वजनिक नैसर्गिक स्त्रोतात करण्यास महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंध केल्याने पश्चिम उपनगरातील काही मंडळांपुढे पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनाचा मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने मंडळांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पश्चिम उपनगरात हा मूर्ती विसर्जनाचा तिढा निर्माण झाला असून अशा मूर्तीचे विसर्जन प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात करावे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. प्रामुख्याने चारकोप, पोयसर भागातील मंडळांमध्ये गोंधळ सुरू झाला आहे. पीओपी मूर्तीची ऑर्डर आधीपासून दिल्यामुळे त्यांनी माघी उत्सवात याच मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे चित्र आहे.
अनेक मंडळांनी पीओपीच्या मूर्तीची ऑर्डर फार पूर्वीच नोंदवली होती. त्यांना विसर्जनाची परवानगी देऊन पालिकेने या पेचातून मार्ग काढवा.- राजन झाड, मूर्तिकार
पीओपी मूर्तीवर बंदी घालणारा निर्णय उच्च न्यायालयाने मागील वर्षीच दिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन होणे आवश्यक आहे. उत्सव सुरू होण्यापूर्वीच आम्ही सर्व मंडळांना नोटीस पाठवून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची सूचना केली होती. विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करुन दिले आहेत. त्याठिकाणी विसर्जन करावे. मोठ्या मूर्तीच्या विसर्झनाबाबतही संबंधित परिमंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. - प्रशांत सपकाळे, पालिका उपायुक्त
नैसर्गिक स्त्रोतात विसर्जन करू नये, असा न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे कृत्रिम तलावात विसर्जन करता येते, मात्र मोठ्या उंचीच्या मूर्तीच्या विसर्जनाबाबत पालिकेनेच मार्ग काढवा.- प्रशांत देसाई, मूर्तिकार
कांदिवलीतील एका मंडळाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विसर्जन करण्याचा आग्रह कायम ठेवला आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना पालिकेकडून परवानगी देता येणार नाही. - भाग्यश्री कापसे, उपायुक्त, परिमंडळ ७
एक दिवसआधी पालिकेच्या नोटीस मिळाल्यापालिकेने उत्सव सुरू होण्यापूर्वी १ दिवसआधी नोटिस दिल्या. मात्र मंडळांनी त्याआधीच मूर्तीची स्थापना केली होती. त्यामुळे येथी आठ मंडळांच्या गणेश विसर्जनाचा पेच आहे. यावर तातडीने मार्ग काढायला हवा, अशी मागणी चारकोपच्या माजी नगरसेविका शुभदा गुडेकर यांनी केली आहे.